केरळातील डाव्यांची घराणेशाही उघड

केरळातील डाव्यांची घराणेशाही उघड

केरळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लेफ्ट डेमोक्रॅटिक अलायन्सने (एलडीएफ) ऐतिहासिक विजय प्राप्त केला. त्यामुळे आता एलडीएफ पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. पिनराई विजयन यांची मंगळवारी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर नव्या मंत्रिमंडळात कोण असणार यावरुन चर्चा सुरु झाल्या आहेत.

यावेळच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पिनराई विजयन वगळता सर्व नवे मंत्री असतील. या निर्णयामुळे केरळच्या माजी आरोग्यमंत्री केके शैलजा उर्फ शैलजा टीचर यांना मंत्रिमंडळातून बाहेर राहावे लागणार आहे. त्यामुळे केरळमध्ये सध्या नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारण, शैलजा यांनी २०१८ मध्ये आलेला निपाह व्हायरस आणि कोरोनाच्या काळात आरोग्यमंत्री म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशभरात केरळची प्रचंड चर्चा सुरु होती. या मॉडेलचा मुख्य चेहरा म्हणून शैलजा यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, आता त्यांनाच मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने अनेकांनी टीकेचा सूर आळवला आहे.

या सगळ्या घडामोडींमुळे डाव्या विचारसरणीच्या पक्षालाही घराणेशाहीची बाधा झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कारण नव्या मंत्रिमंडळात पिनराई विजयन यांचे जावई आणि डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद रियास यांचा समावेश केला जाणार आहे. मोहम्मद रियाझ आणि पिनराई विजय यांच्या मुलीचे गेल्यावर्षी लग्न झाले होते.

हे ही वाचा:

विरोधी पक्षनेत्यांनंतर मुख्यमंत्र्यांना जाग

व्हीव्हीआयपी लस घेतल्याने कुलदीप यादव अडचणीत

मुंबई महानगरपालिकेनंतर आता राज्य सरकारचे ग्लोबल टेंडर

तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा आज गुजरात दौरा

याशिवाय, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) कार्यकारिणीत कार्यकारी सचिव ए विजयराघवन आणि त्यांची पत्नी आर. बिंदू या दोघांनाही स्थान देण्यात आले होते. सीपीएमने मंत्रिपदासाठी दोन नावांची घोषणा केली आहे. यामध्ये आर. बिंदू आणि वीणा जॉर्ज यांचा समावेश आहे. मोहम्मद रियाझ आणि आर. बिंदू हे दोघेही पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. आम्हाला नव्या पिढीला संधी द्यायची असल्याने हा निर्णय घेतल्याचे पक्षाकडून सांगितले. आता येत्या २० तारखेला पिनराई विजयन यांच्यासह मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे.

Exit mobile version