राजीव सातव यांच्या निधनाने शोककळा

राजीव सातव यांच्या निधनाने शोककळा

काँग्रेसचे युवा राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अवघ्या ४६ व्या वर्षी निधन झालेल्या राजीव सातव यांच्या निधनाबद्दल सर्वपक्षीय नेत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. एक तरुण, उमदा, अभ्यासू नेता गेल्याची भावना सर्वांकडून व्यक्त केली जात आहे.

राजीव सातव यांच्या निधनाबद्दल नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर अशा सर्व नेत्यांनी सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी संसदेतील आपला मित्र गमावल्याने दुःख झाल्याचे म्हटले आहे. तर सातव यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला असल्याची भावना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हे ही वाचा:

नाना पटोलेंना समजावणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता

इस्रायलने का केला मीडिया इमारतीवर हल्ला?

पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आपल्या मित्राच्या जाण्यावर दुःख व्यक्त केले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला अशी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनीही सातव परिवाराप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

रविवारी काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी जगाचा निरोप घेतला. २२ एप्रिल रोजी सातव यांना कोवीडने आपल्या विळख्यात घेतले होते. तेव्हापासून सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. या उपचाराचा फायदा होऊन त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. काही दिवसांपूर्वीच सातव हे कोरोनमुक्त झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. पण सातव यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता. त्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरु होते, पण तो बरा होत नव्हता. शनिवारी सातव यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आला होता. पण रविवारी सातव यांच्या निधनाचे वृत्त समोर आले.

Exit mobile version