साकीनाका बलात्कार प्रकरणी भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरले आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांच्या घटना लक्षात घेता बलात्काराच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा चांगलाच बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे राज्यातील सध्याच्या या स्थितीला केवळ राज्य सरकार जबाबदार आहे असे कोटक यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र महिलांवर अत्याचार होत आहेत. तसेच राज्याचे गृहमंत्री प्रत्येक वेळी केवळ प्रतिक्रिया देत आहेत. घडलेल्या एकूणच या घटनेवर भाजप खासदार म्हणाले की, गृहमंत्री घटनेनंतर म्हणतात की मी या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. त्यांची नजर गुन्हेगारांवर असली पाहिजे. गुन्हेगारांमध्ये कायद्याचे भय सध्याच्या घडीला उरलेले नाही. राज्यातील बलात्काराच्या घटनांनी आता शिसारी येऊ लागलीय. असे असले तरीही, सरकारमधील महिला मंत्री घडलेल्या घटनांबाबत कुठेही ब्र काढतानाही दिसत नाहीत. सध्याच्या घडीला कायदा सुव्यवस्था याबाबत तर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेच. साकीनाका हा विभाग सतत गजबजलेला असूनही झालेली घटना ही अतिशय वेदनादायी आणि निंदनीय होती. बलात्कार पीडिता अखेर मृत्यूमुखी पडली.
हे ही वाचा:
‘केरळ मॉडेल’ पुन्हा पहिल्या क्रमांकावर
साकीनाका बलात्कार पीडितेची झुंज अपयशी
भारत – कझाकस्तानमध्ये संयुक्त युद्धाभ्यास
राज्यसभेच्या जागांसाठी ४ ऑक्टोबरला होणार निवडणूक
महाराष्ट्रातील वसुली सरकारला महिलांच्या सुरक्षेची चिंता नाही. कुंभकर्णी झोपेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. गेल्या ५ दिवसात महिलांवरील गुन्हे वाढले आहेत. महाराष्ट्र भाजपा खासदार कोटक यावर अधिक बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात महिलांविरोधातील गुन्ह्यांचा अतिरेक झालेला आहे. पुण्यात एका १४ वर्षांच्या मुलीवर १३ ‘राक्षसांनी’ बलात्कार केला.
पुण्यात ६ वर्षांच्या मुलीचे फुटपाथवरून अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. मुंबईच्या साकीनाका येथे निर्भयाप्रमाणे ३२ वर्षीय मुलीवर निर्घृण बलात्कार झाला. राज्यात महिलांच्या सुरक्षेकडे कुणाचेच लक्ष नाही. महाविकास आघाडी सरकार केवळ मुकबधीर असल्यासारखे गाढ झोपेत आहे.