सुधीर जोशींवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सुधीर जोशींवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री सुधीर जोशी यांचे काल निधन झाले असून त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

आज सकाळी सुधीर जोशी यांचे पार्थिव मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. दादरमधील हरिश्चंद्र रेल्वे मार्गावर असलेल्या मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर वॉर्ड कार्यालयासमोर पारिजात इमारतीत ते राहत होते. या त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव आणण्यात आले आहे. तर सकाळी अकरा वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

हे ही वाचा:

शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल अब्दुल सत्तार यांची चौकशी

किरीट सोमैय्या कोर्लाई गावाकडे रवाना

अवघ्या सोळाव्या वर्षी गुजरातच्या बॅडमिंटनपटू तस्मिनने रचला इतिहास

कर्नाटकमध्ये विद्यार्थ्यांना हिजाब, भगवी शाल घालण्यास बंदी

सुधीर जोशी हे मुंबईचे दुसरे आणि सगळ्यात तरुण महापौर राहिले आहेत. तर १९९५ ते १९९९ या काळात जेव्हा शिवसेना-भाजपा युतीचे सरकार महाराष्ट्रात होते तेव्हा त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदी काम केले आहे. ते महाराष्ट्र सरकारमध्ये महसूल मंत्री होते.

सुधीर जोशी सुरुवातीपासूनच बाळासाहेबांचे खंदे समर्थक आणि एक कट्टर शिवसैनिक ओळखले जातात. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. शिवसेना या पक्षाचा जन्म झाला तेव्हा सुरुवातीच्या काळात जे बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. त्यापैकी एक सुधीर जोशी हे होते. त्यांनी पक्षसंघटनेत अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत.

शिवसेनेचा एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत चेहरा अशी त्यांची ओळख होती. बाळासाहेबांनी त्यांच्या खांद्यावर स्थानीय लोकाधिकार समितीची जबाबदारी सोपवली होती जी जोशी यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. गेल्या काही दिवसांपासून सुधीर जोशी यांची प्रकृती खालावली होती. त्यांना कोरोनाने ग्रासले होते. त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातून बरे होऊन ते घरी देखील परतले होते. पण त्यांची प्रकृती पुन्हा एकदा अस्थिर झाली आणि काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Exit mobile version