प्रचाराची रणधुमाळी थांबली, आता मतदानाकडे लक्ष

सोमवारी अखेरच्या दिवशी सर्व पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला

प्रचाराची रणधुमाळी थांबली, आता मतदानाकडे लक्ष

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचाराचा धुरळा सोमवारी खाली बसला. गेले काही दिवस या निवडणुकीसाठी महायुती, महाविकास आघाडीतील विविध पक्ष, नेते यांनी जोरदार प्रचार केला होता. सभा, मुलाखती यातून आपापली बाजू जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता प्रचार थांबला. आता २० नोव्हेंबरला मतदानातून लोक महाराष्ट्राचे भविष्य निश्चित करतील.

शेवटचा दिवस असल्यामुळे सोमवारी सकाळीच अनेकठिकाणी सभा पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या विविध सभांचे आयोजन करण्यात आले होते. अखेरचा दिवस असल्याने प्रत्येकाने आरोपांची धार अधिक तीव्र केली. बारामतीत तर विद्यमान आमदार अजित पवार आणि त्यांच्या समोर उभे असलेले शरद पवार गटाचे युगेंद्र पवार यांच्यातील लढत होणार असल्यामुळे या दोन्ही पक्षांनी लागोपाठ प्रचारसभा घेत आपले म्हणणे बारामतीच्या मतदारांसमोर हिरीरीने मांडले.

आता अतिशय कडेकोटपणे आचारसंहितेचं पालन राजकीय पक्षांना करावं लागणार आहे. कारण संध्याकाळी सहा वाजेपासून कोणत्याहीप्रकारे प्रचार केल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी आता येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारण बदलले. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात फूट पडल्याने सहा पक्ष आमनेसामने आले. या सगळ्याचे उत्तर महाराष्ट्रातील मतदार कसा देणार याकडे आता सर्वांचे लक्ष असेल.

गेल्या पाच वर्षात झालेल्या राज्यसभा, विधानपरिषद, ग्रामपंचायत निवडणुकात महायुतीने दमदार कामगिरी केली. पण लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळे आता विधानसभेत काय होणार याचे कुतुहल आहे. मात्र यावेळी बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ ह, व्होट जिहाद असे नवे मुद्दे समोर आलेले आहेत. त्यामुळे लोक यातून नेमके महाराष्ट्राच्या हिताचे काय हे कसे निवडतात याची उत्सुकता आहे.

हे ही वाचा:

मणिपूर: केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त ५० तुकड्या होणार तैनात

विधानसभा निवडणुकांचा अंदाज व्यक्त करतायत ही वक्तव्यं…

आपमधून नाराज होऊन बाहेर पडल्यानंतर कैलाश गेहलोत यांचा भाजपमध्ये प्रवेश!

उद्धव ठाकरेंसारख्या खाष्ट सासूमुळेचं सगळे शिवसेनेतून बाहेर पडले

लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांची घोषणा केली. त्यामुळे प्रारंभी महाविकास आघाडीने प्रारंभी हा महिलांना लाच देण्याचा प्रकार आहे, असे आरोप केले पण नंतर याच विरोधी पक्षांनी आम्ही सत्तेवर आल्यास ३ हजार देऊ असे आश्वासन दिले. आज दीड कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यांमध्ये या योजनेचे पैसे आले आहेत. या योजनेमुळे महायुती सरकारची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वातावरण थोडं वेगळं आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात अगदी अटीतटीचा सामना आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार हल्ले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यभरात ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनीही सभा, मुलाखतीतून आपली बाजू त्वेषाने लढविली. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील राज्यभरात सभा घेतल्या. या निवडणुकीत शरद पवार अतिशय आक्रमक बघायला मिळाले.

Exit mobile version