एनडीएला विशेषतः भाजपाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘इंडी’ आघाडी उभी केली आहे. मात्र आता या इंडी आघाडीत आघाडी झाल्याचे चित्र अनेकदा समोर आले आहे. अशातच सध्या इंडी आघाडीमध्ये नेतृत्वावरून काही पक्षांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. इंडी आघाडीमध्ये नेतृत्वावरून सुरू असलेल्या वादावर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते लालू प्रसाद यादव यांनी महत्त्वाचे आणि मोठे वक्तव्य केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची ‘इंडी’ आघाडीच्या नेत्या म्हणून निवड करावी, असे आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
लालू प्रसाद यादव यांच्याकडून आलेल्या या वक्तव्यानंतर इंडी आघाडीमधील काँग्रेस आणि इतर घटक पक्षांमध्ये सर्व आलबेल नसल्याचं समोर आले आहे. लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या विरोध करण्याला काहीही अर्थ नाही. ममता यांना नेता बनवायला हवे. शिवाय लालू यादव यांनी बिहारमध्ये होणाऱ्या पुढील निवडणुकीत त्यांचा पक्ष सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘आज तक’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
यापूर्वी, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले होते की, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह ‘इंडी’ आघाडीच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने आघाडीचे नेतृत्व करण्यास आपला कोणताही आक्षेप नाही. परंतु, हा निर्णय घेताना यासाठी सामान्य लोकांमध्ये एकमत होणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले होते.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकत्याच झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकीत ‘इंडी’ आघाडीच्या खराब कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. शिवाय आपल्याला संधी दिल्यास त्या ‘इंडी’ आघाडीची जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता म्हणाल्या की, त्या बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका सांभाळत असतानाचं विरोधी आघाडी सांभाळण्याची दुहेरी जबाबदारी घेऊ शकतात. एका टीव्ही चॅनलशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “मी इंडी आघाडीची स्थापना केली होती. आता ती व्यवस्थापित करण्याची जबाबदारी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांची आहे. जर ते ते चालवू शकत नसतील तर मी काय करू शकते? मी एवढेच म्हणेन की सर्वांना बरोबर घेऊन जावे लागेल.”
‘इंडी’ आघाडीची जबाबदारी का घेत नाही, असे विचारले असता? यावर ममता म्हणाल्या की, “मला संधी मिळाल्यास मी कामकाज सुरळीत पार पाडेन. मला बंगालच्या बाहेर जायचे नाही, पण मी येथून चालवू शकते.” यावर काँग्रेसने म्हटले की, ममता बॅनर्जी यांचा पक्ष पश्चिम बंगालपुरता मर्यादित आहे आणि राष्ट्रीय पातळीवर ममता बॅनर्जी यांचा पक्ष आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व तितके मोठे नाही.
हे ही वाचा:
श्रीलंकेच्या नौदलाने अटक केलेले २१ भारतीय मच्छिमार मायदेशी परतले
नागरी हक्कांसाठी सहाय्यक ऍटर्नी जनरल म्हणून नियुक्त झालेल्या भारतीय-अमेरिकन हरमीत धिल्लन कोण आहेत?
माजी परराष्ट्र मंत्री एस एम कृष्णा यांचे निधन
‘जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्या’ला फडणवीसांनी का केला फोन?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचे मत आम्हाला माहीत आहे. ममता यांनी आमच्यासोबत राहावे अशी आमची इच्छा आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. काही मतभेद असले तरी ते किरकोळ आहेत. आम्ही कोलकाता येथे जाऊन ममता बॅनर्जी यांच्याशी याबाबत बोलू. यापूर्वी सपानेही ममता बॅनर्जी यांच्या नावाला सहमती दर्शवली होती.