राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न धगधगत असून आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसीमधून आरक्षण हवे असल्याची मागणी लावून धरली आहे. तर, ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी याला विरोध करत यासाठी उपोषण देखील केले होते. दरम्यान लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच जरांगे यांची दुटप्पी भूमिकाही उघड केली आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले की, “मनोज जरांगे हे बिनबुडाचा लोटा आहेत. ज्या लोकांनी मनोज जरांगे यांना आंदोलन करायला प्रवृत्त केले त्या लोकांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत त्यांनी पाठिंबा दिला आणि ओबीसी उमेदवार पाडण्याचे काम केले. त्यांची ही भूमिका संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे,” अशी खोचक टीका करत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंचा दुटप्पी चेहरा उघड केला आहे.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये चकमक, लष्कराचा कॅप्टन हुतात्मा !
केजरीवालांना दिलासा नाहीच; अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
रोहिंग्या, बांगलादेशी मुस्लीम घुसखोरांना गावात राहण्यास, व्यापार करण्यास मनाई
नालासोपारामध्ये पोलिसांची कारवाई; दोन कोटींच्या अमली पदार्थांसह नायजेरीयन महिलेला ठोकल्या बेड्या
“एका बाजुला मनोज जरांगे स्वतःला ९६ कुळी मराठा आहोत म्हणतात आणि दुसरीकडे मागासवर्गीयांच्या ओबीसीतून आरक्षण मागतात. हा प्रचंड विरोधाभास असून ही गोष्ट हास्यास्पद आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे यांनी २८८ उमेदवार रिंगणात उतरवल्यास ओबीसी समाज आणि सुज्ञ नागरिक याचा जाब मनोज जरांगे यांना नक्की विचारतील,” असा ठाम लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे. मनोज जरांगे यांच्याकडून राज्यभरात काढण्यात येणाऱ्या मराठा शांतता रॅलीवरही त्यांनी आक्षेप असल्याचे म्हटले. शांतता रॅलीला शाळा का बंद ठेवल्या जातात? याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्था सरकार पाळू शकत नाही का? असा संतप्त सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.