ब्रिटनमध्ये सत्तांतर घडून आले असून भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव झाला आहे. ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी पंतप्रधान पदासाठी मतदान झालं होतं. या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सकाळी १० वाजेपर्यंत किर स्टार्मर यांच्या लेबर पक्षाने ३८१ जागा जिंकल्या आहेत, तर पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला ९२ जागा मिळाल्या आहेत. एकूण ६५० जागांपैकी ५१५ जागांचा निकाल हाती आला आहे. त्यामुळे २०२४ च्या या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाचा विजय निश्चित मानला जात आहे. विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपला पराभव मान्य केला आहे.
ऋषी सुनक यांनी म्हटलं आहे की, “लेबर पक्षाने सार्वत्रिक निवडणूक जिंकली असून कीर स्टार्मर यांना अभिनंदनासाठी फोन केला.” तसेच आता आता लंडनला जाऊन तिथे निकालाच्या दृष्टीने चिंतन करणार असल्याचं ऋषी सुनक यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान म्हणून मिळालेल्या कार्यकाळात खूप काम केलं. माझं सर्वस्व यामध्ये झोकून दिलं होतं, असं सुनक म्हणाले.
गेल्या १४ वर्षांपासून सत्तेत असलेला कंझर्व्हेटिव्ह पक्ष आणि प्रमुख विरोधी लेबर पक्ष हे दोन मोठे पक्ष ब्रिटनमध्ये आहेत. तेथील सत्ता ही या दोन पक्षांपैकी एकाकडे असते. सध्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व ऋषी सुनक यांच्याकडे आहे तर, मजूर पक्षाची धुरा एप्रिल २०२० पासून स्टार्मर यांच्याकडे आहे.
हे ही वाचा:
काँग्रेस नेते सुनील केदार अडचणीत; नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर
दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या निर्माण करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या सूचना
अंडरवर्ल्डशी संबंधित ३२८ कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयकडून पंतप्रधान मोदींना खास भेट
स्टार्मर यांनी लेबर पक्षाला मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. आम्ही लोकांसाठी काम करु, ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचे देखील आभार, असं स्टार्मर म्हणाले. स्टार्मर यांनी आम्ही जनतेच्या मुद्यांवर बोलत राहू, जनतेसाठी लढू, बदलांसाठी तयार आहोत, असं म्हटलं.