भारतात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका होत आहेत. यामध्ये रविवार, २० फेब्रुवारीला पंजाबचे सरकार निवडण्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पण मतदानाच्या अवघे काही तास आधी प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला आहे. केजरीवाल यांनी कधीही खलिस्तानी ताकदींचा विरोध केला नसल्याचे विश्वास यांनी म्हटले आहे.
मी खलिस्तानी शक्तींचा विरोध करतो असे केजरीवाल कधीही म्हणाले नसल्याचे कुमार विश्वास यांनी अधोरेखित केले आहे. “अरविंद केजरीवाल हे म्हणायला तयार नाहीत की मी खलिस्तानी शक्तींच्या विरोधात प्रतिकार करेन. मी आतंकवादाच्या विरोधात आहे असे ते बोलणार नाहीत. कारण त्यांनी याबाबत भाष्य केले तर त्यांच्यात ज्यांनी गुंतवणूक केली आहे ते नाराज होतील.”
हे ही वाचा:
तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?
‘मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल कॅग ऑडिट करण्याची गरज’
‘भुजबळांची बेनामी मालमत्ता पाहण्यासाठी गेलो म्हणून एफआयआर
उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात
मी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिलेला नाही अथवा मला काढण्यातही आलेले नाही असेही कुमार विश्वास यांनी यावेळी सांगितले. तर अवघ्या काही तासात पंजाब राज्याला ठरवायचे आहे ज्या माणसाला माझ्यापेक्षा ते जास्त ओळखतात अशा व्यक्तीच्या सापळ्यात अडकून राज्याला १९८४ च्या आधीच्या स्थितीत लोटायचे आहे का? असा सवाल विश्वास यांनी केला आहे.
कुमार विश्वास यांनी केजरीवालांवर केलेला प्रहार पंजाब मधील मतदानावर नेमका काय परिणाम करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. पंजाबमध्ये आज सर्व जागांसाठीची मतदानाची प्रक्रिया आज पार पडणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. काँग्रेस, आम आदमी पक्ष, अकाली दल आणि भाजपा-पंजाब लोक काँग्रेस आघाडी असे पक्ष निवडणुकीत आपले नशीब आजमावताना दिसत आहेत.