एकीकडे हिंडेनबर्गने अदानी उद्योगसमूह तसेच सेबीच्या प्रमुख माधवी बुच यांच्यावर आरोप केल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचे नेते के.टी. रामा राव यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी हिंडेनबर्ग, अदानी प्रकरणात काँग्रेस दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे.
राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस अदानी उद्योगसमुहाबाबत एक भूमिका घेते पण त्याच काँग्रेसचे तेलंगणातील सरकार मात्र अदानींबाबत वेगळीच भूमिका घेते, हे कसे काय, असा सवार रामा राव यांनी विचारला आहे.
काँग्रेसने आता २२ ऑगस्टला देशभरात सेबी-अदानी मुद्द्यावरून आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रामा राव यांनी काँग्रेस ला हा जाब विचारला आहे.
रामा राव म्हणतात की, काँग्रेसने सेबी-अदानी मुद्द्यावर देशभरात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे पण त्यांची दुटप्पी भूमिका बीआरएसला दिसत आहे. ते म्हणाले की, जर अदानी हे राष्ट्रीय स्तरावर अयोग्य आहेत पण तेलंगणात ते कसे काय योग्य आहेत?
हे ही वाचा:
नाझिया खान यांनी शिवम दुबेच्या पत्नीला केला सवाल, तुमचा विवाह मुल्ला-मौलवींना मान्य आहे काय?
कोलकातामधील डॉक्टर बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक १ हजार ९५० कामांना मंजुरी
पाकिस्तानच्या ऑलिम्पिकवीर अर्शद नदीमचे लष्कर-ए-तैयबाचा दहशतवाद्याबरोबर फोटो
अदानी उद्योगसमुहाने तेलंगणातील काँग्रेस सरकारसोबत चार करार केलेले आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात तेलंगणामध्ये जवळपास १२ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. याच मुद्द्यावर रामा राव यांनी राहुल गांधींना सवाल केला की, राहुल गांधी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना अदानी उद्योगसमुहाशी केलेले करार रद्द करण्याचे आदेश देऊ शकतील का? की आपली सोय बघून पावले टाकतील. बीआरएसला तेलंगणाच्या भवितव्याची चिंता आहे, काँग्रेसला ती आहे का?
हिंडेनबर्गने पुन्हा एकदा अदानी उद्योगसमुहाला लक्ष्य केले. त्यांनी शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवणारी संस्था सेबी आणि अदानी यांचा कसा संबंध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला तसेच या संबंधांमुळेच सेबी अदानी यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोपही केला. सेबीच्या प्रमुख माधवी बुच यांनी अदानी उद्योगसमुहाच्या ऑफशोर फंडमध्ये गुंतवणूक केल्याचे हिंडेनबर्गचे म्हणणे आहे.यानंतर काँग्रेस व इंडी आघाडीतील पक्षांनी बुच यांची सेबीमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसेच संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून याची चौकशी व्हावी अशी मागणीही केली आहे. त्याउलट भाजपाने काँग्रेस व विरोधी पक्षांवर आरोप केला आहे की, या माध्यमातून देशात अस्थितरतेचे वातावरण तयार व्हावे ही त्यांची इच्छा आहे.