क्रांती रेडकरने का सुनावले वेबसाईटला?

क्रांती रेडकरने का सुनावले वेबसाईटला?

अभिनेत्री आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने ट्विटच्या माध्यमातून एका वृत्तवेबसाइटला चांगलेच सुनावले आहे.

संबंधित वेबसाइटने त्यांच्या एका बातमीच्या शीर्षकात क्रांतीविषयी चुकीची माहिती दिली होती. क्रांतीवर आयपीएल मॅच फिक्सिंगचे आरोप असल्याचे शीर्षक त्यांनी दिले आहे. क्रांतीने ट्विट करत यावर आक्षेप घेतला आहे. फक्त काही व्ह्यूज मिळावे यासाठी तुम्ही दिशाभूल करणारे शीर्षक दिले, हे कशासाठी? असा सवाल तिने विचारला आहे.

‘तुम्ही हे काय करत आहात? फक्त काही व्ह्यूज मिळावे यासाठी तुम्ही दिशाभूल करणारे शीर्षक दिले हे कशासाठी? मी आधीच याप्रकरणी कोर्टात खटला लढवला आणि त्यात मी जिंकलेसुद्धा. मी तुमची संपूर्ण बातमी वाचली, चुकीच्या ओळखीचे प्रकरण त्यात लिहिले आहे. पण मग हे शीर्षक असे का? माझी आणि समीरची प्रतिमा खराब करण्यासाठी, फक्त पैशांसाठी?’ अशा शब्दांत क्रांतीने तिचा संताप व्यक्त केला आहे.

‘प्रत्येकजण पूर्ण बातमी वाचत नाही. तुमच्या निष्काळजी आणि असंवेदनशील लिखाणामुळे लोक मला ट्रोल करतात. आम्हालाही भावना आहेत, तुमच्या अशा चटपटीत बातम्या आम्ही खपवून घेणार नाही. जर मी दोषी असते, तर मी माझी चूक मान्य केली असती. पण मी दोषी नाही म्हणून मी हे सहन करणार नाही,’ असेही तिने एका ट्विटमध्ये लिहिले आहे.

याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनीही ट्विट करत क्रांती रेडकर हिच्या सोबत असल्याचे सांगितले आहे. ‘काय जमाना आहे. आर्यन खानच्या पाठीशी बॉलीवूडसह सरकार उभे राहिले. तर जीव धोक्यात घालणाऱ्या समीर वानखेडे व त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्यावर अभद्र भाषेत टीका सुरू आहे जेव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा सत्ताधाऱ्यांचे खरे रूप समोर येते. क्रांती, महिला म्हणून मी तुझ्या सोबत आहे.’ असे ट्विट भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले आहे.

Exit mobile version