महाविकास आघाडीतील दोन नेत्यांना ईडीचे समन्स मिळाल्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांना वेगवेगळ्या प्रकरणी ईडीने समन्स बजावले आहे. रोहित पवार यांना बारामती ऍग्रो प्रकरणामध्ये ईडीने समन्स बजावलं आहे. तर, किशोरी पेडणेकर यांना कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे. या दोन्ही नेत्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवारांना समन्स
काही दिवसांपूर्वी ईडीने बारामती ऍग्रो कारखाना आणि रोहित पावारांच्या संबंधित ठिकाणी छापेमारी केली होती. एकूण सात ठिकाणी ईडीने सर्च ऑपरेशन केलं होतं. ज्यामध्ये पुणे आणि बारामतीमधली काही ठिकाणांचा समावेश होता. आता रोहित पवार यांना थेट ईडीने समन्स पाठवलं आहे. त्यांना बुधवारी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने राबवण्यात आलेली लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती अॅग्रो कारखान्याचा काय संबंध होता, याविषयी चौकशी होणार आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत कारखान्यांची जी विक्री झालेली होती, त्यात रोहित पवारांचं नाव आलेलं होतं. त्याच प्रकरणात रोहित पवारांना ईडीने समन्स पाठवलेलं आहे.
बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांना समन्स
मुंबई महापालिकेने करोना काळात डेड बॉडी बॅग खरेदीत कथित घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीने किशोरी पेडणेकर यांना येत्या गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. किशोरी पेडणेकर यांना याआधीदेखील ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत.
करोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी देखील तपास केला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरु असतानाच ईडीनेदेखील या प्रकरणाची दखल घेत समांतर तपासाला सुरुवात केली आहे.
हे ही वाचा:
देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींकडून लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश म्हणाला, ‘माझा रामलल्ला विराजमान झाला’!
नरेंद्र मोदींच्या रूपाने ग्लोबल, व्हिजनरी लीडर लाभला
मणिपूरमधील हिंसाचारात म्यानमारच्या दहशतवाद्यांचाही सहभाग?
करोना काळात मृतदेहांसाठी खरेदी करण्यात आलेल्या बॅग्स मुंबई महापालिकेने बाजार भावापेक्षा जास्त दराने खरेदी केल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कथित घोटाळा प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे.