मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आणि नंतर त्याच आरोपाखाली फाशी देण्यात आलेल्या याकुब मेमनचा चुलत भाऊ रौफ मेमनसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर बोलत असल्याचा व्हीडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे त्या बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्या याकुब मेमनच्या कबरीचा मुद्दा चर्चेत आहे. मरीन लाइन्स येथील बडा कब्रस्तानमध्ये याकुब मेमनची कबर असून तिथे लायटिंग केल्याबद्दल आणि संगमरवरी फरशी बसविण्यात आल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखविले जात आहे. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर देत या सरकारचा यात कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पण आता किशोरी पेडणेकरच याकुबचा भाऊ रौफसह एका बैठकीत बसलेल्या दिसत असल्यामुळे किशोरी पेडणेकरांवर आता आरोप केले जात आहेत. त्यामुळे शिवसेनेचा त्या कबरीच्या सुशोभिकरणात सहभाग होता का, असा प्रश्नही विचारला जात आहे.
यासंदर्भात टाइम्स नाऊ नवभारत वाहिनीने किशोरी पेडणेकर यांना विचारल्यावर त्यांनी आपला याच्याशी कोणताही संबंध नाही. आपण महापौर असताना अनेक ठिकाणी आपल्याला जावे लागत असे. तसे आपल्याला कुणीतरी रौफ यांच्याकडे नेले असावे. अर्थात, आपण हा व्हीडिओ किंवा फोटो अद्याप बघितलेला नाही, असे सांगितले.
हे ही वाचा:
पुरामुळे पाकिस्तान उद्ध्वस्त, २० अब्ज डॉलरचा फटका
फोटो काढण्यासाठी लोकांनी जवळ तर यायला हवं?
बद्रिनाथला मुंबईतील भाविकांची कार दरीत काेसळली आणि
हिमाचलमध्ये १८ हजार फुटांवर बंगालचे चार पर्यटक झाले बेपत्ता
पत्रकाराने किशोरी पेडणेकर यांना विचारले की, तुम्ही ज्या बैठकीत उपस्थित राहिलात तिथे रौफ मेमनही आहेत हे तुम्हाला माहीत होते का, त्यावर किशोरी पेडणेकर म्हणतात की, मला माहीत नाहीए हे काय आहे. मला फोटो बघावे लागतील. कदाचित मी तिथे गेलेही असेन. मी नाकारत नाही. मी अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आले आहे. माझ्याशी कुणी बोलले असेल तर मला माहीत नाही. माझ्या एक सहकारी आहेत आशा मामेडी त्यांनी नेले असावे. यशवंत जाधव हेसुद्धा सोबत असावेत. महापौर म्हणून ते मला सोबत घेऊन गेले असावेत.
याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यावरून सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. मुंबई पोलिसांनी मात्र या कबरीवरील लायटिंग काढून टाकली आहे. तिकडे वक्फ बोर्डाला या सुशोभिकरणाविषयी या कब्रस्तानचे तत्कालिन ट्रस्टींनी कळविले होते पण वक्फ बोर्डाने त्याला प्रतिसाद दिलेला नाही, असेही त्या ट्रस्टींचे म्हणणे आहे. त्यामुळे यात वक्फ बोर्डाची कोणती भूमिका आहे, हे विचारले जात आहे. तूर्तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी होईल असे म्हटल्यामुळे येत्या काळात वास्तव समोर येणार आहे.