भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. अपेक्षेप्रमाणे हा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा विषय सभागृहात मांडला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात या प्रकरणी चौकशीची मागणी केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जो विषय मांडला आहे तो गंभीर आहे. राजकारणात अनेक प्रसंग येत असतात. माझ्याकडे पुरावे द्या. कोणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कुठलंही प्रकरण दाबलं जाणार नाही. सखोल आणि वरिष्ठ स्तरावरील चौकशी केली जाईल,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओचा मुद्दा मांडत टीका केली. “काही लोक ईडी, सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षांतील नेत्यांना भीती दाखवतात आणि दुसरीकडे आपल्या केंद्रीय यंत्रणेत ओळखी असून महिलांशी संपर्क करत असल्याचं समोर आलं आहे. महामंडळात नियुक्त्या देतो, विधानपरिषदेवर घेतो असं सांगितलं जातं आणि एक्स्टॉर्शन केलं जातं. अनेक महिलांनी मला येऊन माहिती दिली आहे. ८ तासांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. माता भगिनींना त्रास देणाऱ्या किरीट सोमय्यांना सरकार सुरक्षा देणार का? मी त्याचा पेन ड्राईव्ह आपल्याला देतो. हा माणूस पुन्हा मुंबई पोलिसांना पत्र लिहितो आणि चौकशी करा म्हणतो,” असे अंबादास दानवे म्हणाले. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा:
छोटा शकीलचे आर्थिक व्यवहार संभाळणाऱ्या आरिफ भाईजानची संपत्ती जप्त
कथित व्हिडीओ प्रकरणी किरीट सोमय्यांची चौकशीची मागणी
विरोधकांच्या बैठकीत गेलेल्या उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी
कोविड घोटाळ्याप्रकरणी एसआयटीकडून मुंबई महापालिकेत चौकशी
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, व्हिडिओची सत्यता तपासून घ्यावी अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे. “मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, हे या ठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी अशी विनंती करत आहे,” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे