किरीट सोमय्या यांनी गगराणी यांना लिहिले पत्र
संजय राऊत यांनी शौचालय घोटाळ्याचा जो १०० कोटींचा आकडा दिला आहे, तो आला तरी कुठून असा सवाल उपस्थित करत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भातील एकही माहिती व कागद उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, असे म्हटले आहे. सोमय्या यांनी प्रधान सचिव नगरविकास विभाग भूषण गगराणी यांना पत्र लिहून वास्तव परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.
युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा सोमय्या यांना बदनाम करण्याचा हा भाग असून ज्या योजनेत घोटाळा झाला आहे असा आरोप केला जात आहे ती योजना युवक प्रतिष्ठानच किंवा मेधा सोमय्या यांची खाजगी शौचालय योजना नव्हती. या योजनेसंदर्भातील निर्णय राज्य सरकार व संबंधित महापालिकेने घ्यायचे होते व घेतले होते, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तीन पानी पत्रात सोमय्या यांनी सविस्तर सगळी माहिती दिली आहे.
सोमय्या यांनी पुढे म्हटले आहे की, हा प्रकल्प केव्हाचा आहे, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यासंदर्भातील कोणतीही कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत. युवक प्रतिष्ठानने स्वतःच्या जमिनीवर किंवा महापालिका, एमएमआरडीएच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतेही शौचालय बांधलेले नाही. ज्या मीरा भाईंदर महानगरपालिकेत शौचालयाचा उल्लेख केला गेला ती योजना कोणती होती, कुणी राबवायची होती, जागा कुणी सुचवायची होती, याची का नोंद घेतली जात नाही.
हे ही वाचा:
भाजपाने पत्राचाळीतून भ्रष्टाचारविरोधी अभियानाचा बिगुल फुंकला!
पत्राचाळजवळ काय होणार? भाजपाचे पोलखोल आंदोलन संध्याकाळी
२०२४ मध्ये ‘ही’ जागा शंभर टक्के भाजपा जिंकणार!
‘राज ठाकरे घेणार उद्धव ठाकरेंची जागा’
१५ ते २० वर्षांपूर्वी ही शौचालयाची योजना आली होती आणि आज तो १०० कोटींचा घोटाळा व सीआरझेड भंग अशा प्रकारचा अहवाल तयार केला जात असेल तर त्याचा पुनर्विचार व्हावा, असेही सोमय्या यांनी लिहिले आहे.
१०० कोटींचा घोटाळा हा मेधा सोमय्या यांना बदनाम करण्यासाठी काही शिवसेना नेते प्रयत्न करत आहेत. १५ वर्षांत यासंदर्भात कोणताही एक कागद नाही, चौकशी नाही, आज २०२२मध्ये १०० कोटींचा घोटाळा म्हणून त्याचा उल्लेख केला जात आहे, असेही सोमय्या यांनी या पत्रात म्हटले आहे.