भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या मुंबई येथील सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात दाखल झाले. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संबंधात तक्रार दाखल करण्यासाठी सोमैय्या हे सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत जरंडेश्वर साखर कारखान्याचे संस्थापक संचालकही उपस्थित होते.
किरीट सोमैय्या गेल्या काही काळापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विविध प्रकारचे आरोप करताना दिसत आहेत. सोमैय्या हे या मंत्र्यांच्या मागे हात धुवून लागल्याचे पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख, अनिल परब, हसन मुश्रीफ या मंत्र्यांनंतर नंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा सोमैय्यांच्या रडारवर आहेत. अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रकरणात सोमैय्या सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवार, २० ऑक्टोबर रोजी सकाळी ट्विटरच्या माध्यमातून सोमैय्या यांनी हे जाहीर केले की दुपारी दोन वाजता ते ईडीच्या कार्यालयात जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भात तक्रार दाखल करणार आहोत. तर यावेळी त्यांच्यासोबत जरंडेश्वर साखर कारखान्याचे संस्थापक संचालकही उपस्थित राहणार असल्याचा दावाही सोमैय्या यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रकरणात तक्रार दाखल करून त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द केले आहेत.
हे ही वाचा:
मानवी शरीरात बसविली डुकराची किडनी; काय आहे संशोधन?
सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी
बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली
काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा
तर सोमैय्या सक्तवसुली संचालनालय कार्यालयात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळाला आहे. सोमैय्या ईडीच्या कार्यालयात दाखल होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी सोमैय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तर नारायण राणे यांच्या चौकशीचे काय झाले? अशा प्रकारच्या घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. पण पोलिसांनी कारवाई करून या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान ईडी कार्यालयातून बाहेर आल्यावर किरीट सोमैय्या यांनी माध्यमांशी बोलताना पवार कुटुंबावर सडकून टीका केली आहे. पवार कुटुंब नौटंकी करते असा घणाघात सोमैय्या यांनी केला आहे. जरंडेश्वरवर जेव्हा आयकर विभागाच्या धाडी पडल्या तेव्हा अजित पवारांनी डोळ्यात पाणी आणून बहिणींवर कारवाई केल्याचे सांगितले होते. पण बहिणच जर मालक दाखवण्यात आली आहे मग चौकशी झाली तर नाटके का करावीत असे सोमैय्या यांनी म्हटले आहे.