‘विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ नये म्हणून सुरक्षा द्या’

‘विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ नये म्हणून सुरक्षा द्या’

किरीट सोमय्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना लिहीले पत्र

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या संबंधित मालमत्तांवर ईडीने धाडी टाकल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत या प्रकरणातील व्यावसायिक विभास साठे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. या संदर्भातले पत्र किरीट सोमय्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना लिहीले आहे.

ईडीने अनिल परब यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणी २६ मे रोजी छापा मारला होता. यामध्ये दापोलीतील रिसॉर्टची कथित विक्री अनिल परब यांना करणारे विभास साठे यांच्या निवासस्थान आणि कार्यालयाचाही समावेश होता. त्यामुळे त्यांचा मनसुख हिरेन होऊ नये यासाठी त्यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र किरीट सोमय्या यांनी लिहिले आहे.

पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. अनिल परब यांनी मे २०१७ मध्ये विभास साठे यांच्याकडून दापोलीतील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील जमीन घेतली. तसेच फ्रॉड, चीटिंग करून तिथे रिसॉर्ट बांधला. अनिल परब या घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. म्हणून आम्हाला भीती वाटते की, अनिल परब हे विभास साठेंवर दडपण आणणार आहेत. त्यामुळं विभास साठे यांचे ‘मनसुख हिरेन’ होऊ नये आणि हे पाहण्याची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांची आहे. विभास साठे यांच्या जिवाला धोका लक्षात ठेऊन त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी, अशी विनंती सोमय्यांनी पत्राद्वारे पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

हे ही वाचा:

नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने सहा मुलांना ढकलले विहिरीत

समीर वानखेडेंची चेन्नईला बदली

माजी मंत्र्यांच्या घरात घुसून मागितली खंडणी

मरिन लाईन्स समुद्रात इसमाची आत्महत्या

दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आपल्यावर कारवाई केली, यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा काहीही संबंध नाही अशी माहिती अनिल परब यांनी ईडीने केलेल्या चौकशीनंतर दिली होती. दापोलीतील रिसॉर्ट हे सदानंद कदम यांच्या मालकीचे असून त्याच्याशी माझा काही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर ईडीच्या हाती अनिल परब यांनी या रिसॉर्ट संबंधी मुरुड ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र लागलं आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version