राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार, १४ मे रोजी मुंबईत सभा घेऊन भाजपा आणि भाजपा नेत्यांवर टीका केली. यावेळी त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“बाळासाहेब ठाकरे हे असली आहेत तर उद्धव ठाकरे हे नकली आहेत,” असे म्हणत किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. “उद्धव ठाकरे हे डरपोक आहेत. त्यांनी एकाही घोटाळ्यावर अजूनही स्पष्टता दिलेली नाही. असली कोण आणि नकली कोण हे जनतेला माहिती आहे. तुमच्या माफिया सेनेच्या १८ जणांची चौकशी सुरु आहे,” अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.
“संजय राऊत यांचा बोलवता धनी उद्धव ठाकरे आहेत. तुमचे अनेक मंत्री न्यायालयात चकरा मारत आहेत. काही जेलमध्ये आहेत, तर काही रुग्णालयात आहेत,” असा टोला किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. “उद्धव ठाकरेंना न्यायालयाने उत्तर दिलं आहे. काल ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तुमच्यात हिंम्मत असेल ते १९ बंगले कोणाचे आहेत हे स्पष्ट करा,” असे किरीट सोमय्या म्हणाले. “महाराष्ट्रच्या जनतेला लुटण्याचं काम उद्धव ठाकरे सरकार करत असून तेजस ठाकरे यांनीही मनी लॉंड्रिंग केली आहे. रश्मी ठाकरेंबद्दल मला जास्त बोलायचे नाही,” असे किरीट सोमय्या म्हणाले.
हे ही वाचा:
अष्टपैलू माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघाती निधन
अरे छट् हा तर निघाला… आणखी एक टोमणे बॉम्ब
मुन्नाभाईचा केमिकल लोचा आठवत राज ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरे यांची काल मुंबईतल्या बीकेसी मैदानावर घेतलेल्या जाहीर सभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते किरीट सोमय्या आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टिकेला सोमय्या यांनी आज उत्तर दिले. तर देवेंद्र फडणवीस यांनी “अरे छट्, हा तर निघाला आणखी एक टोमणे बॉम्ब” असं ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्या सभेतील भाषणाला टोला लगावला आहे.