‘पवारांच्या धमक्यांना भीक घालत नाही’

‘पवारांच्या धमक्यांना भीक घालत नाही’

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचं कौतुक करताना राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. तसेच शरद पवार यांच्या आशीर्वादाने अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा गृहमंत्रीपदावर बसवायचे आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

‘शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. धमकी कोणाला? सुप्रीम कोर्टला, हायकोर्टला, ईडीला, भाजपला की किरीट सोमय्यांना?’ असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे. ‘फक्त अनिल देशमुख नाही, जितेंद्र आव्हाडांची पण अटक झाली, आनंद अडसूळ यांची पण अटक झाली. महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच’ असे ट्विट करत किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

१०० कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक केली होती सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना न्यायालयाने कालच फरार घोषित केले आहे.

Exit mobile version