‘त्या १९ बंगल्यांचा कर रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर भरतायत’

‘त्या १९ बंगल्यांचा कर रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर भरतायत’

मंगळवारी संजय राऊत यांनी शिवसेनेची पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आपण मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांची पत्रकार परिषद ही फुसका बार असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या आरोपांना किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले आहेत. त्या १९ बंगल्यांचे कर रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर भरत असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. तसेच कोरलाई येथे ठाकरे कुटुंबियांचे १९ बंगले असल्यास मी राजकारण सोडेन आणि दिसले नाहीत तर किरीट सोमय्या यांना जोड्याने मारीन, असे वक्तव्य केले होते.

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत काही कागदपत्रे सादर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० रोजी कोरलाईमधील त्या १९ बंगल्यांचा कर कोरलाई ग्रामपंचायतीत भरल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. जोड्यांनी कोणाला मारणार आहात तुम्ही? असा सवाल देखील त्यांनी केली. रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी कर भरला आहे. बंगले नाहीत तर मग कर का भरत आहात? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

अन्वय नाईकने २००८ मध्ये बंगले बांधले. २००९ पासून १९ बंगल्यांचा कर हा रश्मी ठाकरे आणि वायकर यांनी भरला आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांनी जागा कधी घेतली? गेल्या वर्षीपर्यंत ते कर भरत होते. जर बंगले त्यांच्या नावावर नाहीत तर मग कर का भरला?

किरीट सोमय्या यांनी काही कागदपत्रे दाखवत ही माहिती समोर आणली आहे. हे सर्व रेकॉर्ड्स कोरलाई ग्रामपंचायतीतून माहितीच्या आधारे काढण्यात आले आहेत. ठाकरे सरकारच्या काळातच हे सर्व कागद असून मी काढलेले रेकोर्ड नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले.

हे ही वाचा:

शिवसेना आमदार लता सोनवणे यांना जात पडताळणी समितीचा दणका

ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन

संजय राऊत यांचा ‘साडे तीन’ चा फ्लॉप शो…

मोहित कंबोज म्हणतात, म्हणून संजय राऊत यांना घाम फुटला!

मला जेलमध्ये टाकणार असाल तर, मी स्वत: येतो, असे किरीट सोमय्या म्हणाले. खोली कशाला सॅनिटाईज करता, असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे. कोविड सेंटर घोटाळ्यावर कारवाई का करत नाही? असा सवाल त्यांनी विचारला आहे. माहिती घेण्यासाठी मंत्रालयात गेलो होतो, तेव्हा फोटो व्हायरल झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मग तेव्हा अटक का केली नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केली आहे. राकेश वाधवान यांच्याशी काहीही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांच्याकडे माहिती आहे सगळी तर त्यांनी ती मुख्यमंत्र्यांना द्यावी. कोविड घोटाळे संदर्भात संजय राऊत काहीच बोलत नाहीत, असा टोलाही किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.

Exit mobile version