‘महाआघाडी आणि रझा अकादमीच्या नेत्यांना ठाकरे पवार सरकारकडून अटक का नाही?

‘महाआघाडी आणि रझा अकादमीच्या नेत्यांना ठाकरे पवार सरकारकडून अटक का नाही?

त्रिपुरात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराविरोधात काढलेल्या रॅलीला हिंसक वळण लागल्याने त्याचे पडसाद राज्यातील मालेगाव, नांदेड, अमरावतीत दिसून आले. हिंसाचारानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारला याप्रकरणी धारेवर धरले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला या हिंसाचार प्रकरणी सवाल केला आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ‘व्होट बँक आणि तुष्टीकरणसाठी मस्जिदचा नावाने खोटी माहिती देणे, लोकांना भडकवणे आणि उग्र भाषणे करणाऱ्या महाआघाडी आणि रझा अकादमीच्या नेत्यांना ठाकरे पवार सरकारने अजूनपर्यंत अटक का केली नाही?’ असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे.

त्रिपुरा राज्यात मशीद जाळल्याच्या कथित घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. नांदेड, अमरावती, तसेच मालेगाव अशा शहरात मुस्लीम बांधवांनी मोठे मोर्चे काढले. या मोर्चाला काही ठिकाणी गालबोट लागले. त्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनीही रझा अकादमीवर टीकास्त्र सोडले होते. रझा अकादमीच ही हिंसा आणि दंगल उसळण्याला कारणीभूत असल्याचे आणि सरकारने त्यांच्यावर बंदी घालावी, असे नितेश राणे यांनी काल ट्विट करत म्हटले आहे. अन्यथा महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू असा इशाराही त्यांनी दिला होता.

Exit mobile version