‘हातोडा’ घेऊन सोमय्या दापोलीकडे निघाले

‘हातोडा’ घेऊन सोमय्या दापोलीकडे निघाले

भाजपा नेते किरीट सोमय्या हे सत्ताधारी नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत असतात. सध्या ते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडण्यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. या रिसॉर्टवर कारवाई व्हावी आणि रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून किरीट सोमय्या हे आज दापोलीकडे रवाना झाले आहेत.

किरीट सोमय्या यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते ४० ते ५० गाड्या भरून दापोलीला रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी ‘चलो दापोली, तोडो रिसॉर्ट’चा नारा दिला. घरातून निघण्यापूर्वी किरीट सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक भला मोठा हातोडाही दाखवला.

मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत साई रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जोरदार रोड शो करत आपल्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा दिल्या.

यापूर्वी किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर त्यांच्या दापोली दौऱ्याची माहिती दिली होती. तसेच त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तुमचे सगळे घोटाळे बाहेर काढणार, असा इशारा त्यांनी दिला.

हे ही वाचा:

आजपासून आयपीएलचा रणसंग्राम; चेन्नई, कोलकाता आमनेसामने

उत्तर प्रदेशानंतर आता दापोलीत चालणार बुलडोझर?

‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो कायदेश्वर’

‘कोरोना काळात शालेय शिक्षणासाठी फी कमी न करणारं महाराष्ट्र एकमेव राज्य’

किरीट सोमय्या यांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आधीच विरोध केला आहे. या निमित्ताने सोमय्या यांचं शक्तीप्रदर्शन सुरू असून मुंबईत थेट खेड आणि खेडहून दापोलीपर्यंत १०० वाहनांचा ताफा त्यांच्या ताफ्यात असणार आहेत. नवी मुंबई येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले असून पनवेलमध्येही त्यांचे जंगी स्वागत होणार असल्याची माहिती आहे. दापोलीत पोहचल्यावर सोमय्या सुरुवातील पोलीस ठाण्यात जाणार आहेत. त्यानंतर मुरूड येथील साईल रिसॉर्टवर हा मार्च जाणार आहे.

Exit mobile version