भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज दिल्लीत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. किरीट सोमय्या यांच्यासोबत मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, गिरीश बापट हे देखील उपस्थित होते. जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा झाल्याची आणि किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्यात यावी यासाठी ही भेट घेण्यात आली.
कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणीचे निवेदन देण्यासाठी किरीट सोमय्या हे शनिवारी पुणे महानगरपालिकेत पोहचले असता शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की केली होती. या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या हे पायऱ्यांवरून पडले आणि त्यांना दुखापत झाली होती. केंद्रीय सुरक्षा असणाऱ्या व्यक्तीवर हल्ला कसा केला जातो? सुरक्षेमध्ये त्रुटी कशा राहिल्या? या प्रकरणी चौकशी व्हावी तसेच पुणे पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता यांची बदली करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी गृहसचिवांकडे केली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी संगनमत करुन जीव घेण्याचा कट रचला असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे.
हे ही वाचा:
विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगींनी केला खास फोटो शेअर
‘व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही, जनतेला सुविधा पुरविण्याला प्राधान्य’
थंडीमुळे मतदानाला थंड सुरुवात!
पंतप्रधानांनी पुन्हा केले ‘पहले मतदान, फिर जलपान’ चे आवाहन
पुणे महानगरपालिकेने कोविड सेंटरचे कंत्राट देणार असलेल्या कंपन्यांना नाकरले असताना राज्य सरकारने त्याच कंपन्यांना कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला असून याप्रकरणी १०० कोटींचा घोटाळा झाला आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे सरकारने संजय राऊत यांच्या बेनामी कंपन्यांना कंत्राट दिले आहे. याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी गृहसचिवांकडे करण्यात आली आहे. चौकशी केली जाईल असे आश्वासन गृहसचिवांनी दिल्याचेही मनोज कोटक यांनी सांगितले. गृहसचिवांची भेट घेऊन झाल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या आणि खासदार मनोज कोटक यांनी माध्यमांशी संवाद साधून ही माहिती दिली आहे.