अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांची गेल्या चार तासांहून अधिक वेळ चौकशी सुरू आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी किरीट सोमय्या म्हणाले की, नवाब मलिक हे आता मंत्रिमंडळात राहू शकत नाहीत.
नवाब मलिकांची माहिती मी मुख्यमंत्र्यांपासून राज्यपाल आणि सर्व तपास यंत्रणांना दिली होती. माझ्याकडे पुरावे असल्याने मी लोकांसमोरही माहिती ठेवली. पत्रकारांना घोटाळ्याचे कागद दिले, असे किरीट सोमय्या म्हणाले. आमच्यापर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही असं सत्ताधाऱ्यांना वाटत होते. लोकांना विश्वास पटल्याने ते समोर येऊन भ्रष्टाचाराची माहिती देतात, असेही किरीट सोमय्या म्हणाले. ईडीने चौकशी सुरू केलेले मंत्री नवाब मलिक यांचे आता एक एक प्रकरण बाहेर येईल. त्यामुळे नवाब मलिक हे आता मंत्रिमंडळात राहू शकत नाहीत, अशी घाणाघाती टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.
ठाकरे कुटुंबियांचे असलेले १९ कथित बंगल्यांबाद्द्ल देखील राज्यपालांना माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. १९ बंगल्यांचे गौडबंगाल काय आहे याची सविस्तर माहिती दिली. भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतल्याची माहिती सोमय्यांनी दिली.
हे ही वाचा:
मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याचे नाव दाऊद सोबत जोडले जाते
‘खीर खाल्ल्यावर कितीही चेहरा भोळा भाबडा केला, तरी घागर बुडणारच’
‘दाऊद सबंधितांशी नवाब मलिकांचे व्यावसायिक संबंध’
नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु! आज अटक होणार?
रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावात ठाकरे कुटुंबियांचे १९ बंगले असून त्याचा कर रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर भरत असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी कोर्लाई गावाला भेट देऊन बंगले असलेल्या जागेची पाहणी केली होती. मात्र, तेव्हा या ठिकाणी बंगले नसल्यामुळे त्यांनी बंगले गायब झाल्याची तक्रार देखील केली होती. याच संबंधी चर्चा करण्यासाठी किरीट सोमय्या हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी जात असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले होते. तसेच नवाब मलिक यांच्या उत्कृष्ट कामगिरीवर देखील चर्चा करणार असल्याचा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला होता