मंत्री नवाब मलिक यांना आज ईडीने चौकशीसाठी नेल्यावर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या हे आज २३ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. ठाकरे कुटुंबियांचे असलेल्या कोर्लाई गावातील १९ बंगल्यांसंबंधी चर्चा करण्यासाठी किरीट सोमय्या हे राज्यपालांना भेटण्यासाठी जात आहेत.
अलिबाग येथील कोर्लाई गावात ठाकरे कुटुंबियांचे १९ बंगले असून त्याचा कर रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर भरत असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली होती. त्यांनी पत्रकार परिषदेत या संबंधी काही कागदपत्रे देखील समोर आणली होती. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी कोर्लाई गावाला भेट देऊन बंगले असलेल्या जागेची पाहणी केली होती मात्र तेव्हा या ठिकाणी बंगले नसल्यामुळे त्यांनी बंगले गायब झाल्याची तक्रार देखील केली होती. याच संबंधी चर्चा करण्यासाठी किरीट सोमय्या हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी गेल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. तसेच नवाब मलिक यांच्या उत्कृष्ट कामगिरीवर देखील चर्चा करणार असल्याचा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.
हे ही वाचा:
‘खीर खाल्ल्यावर कितीही चेहरा भोळा भाबडा केला, तरी घागर बुडणारच’
‘दाऊद सबंधितांशी नवाब मलिकांचे व्यावसायिक संबंध’
नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु! आज अटक होणार?
‘दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल’
आज पहाटे ४.३० वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या मुंबई येथील निवास्थानी दाखल झाले. त्यानंतर नवाब मलिक यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले आहे. कुर्ल्यामधील मोक्याची जागा तुटपुंज्या किंमतीत खरेदी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर केला होता. तसेच मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांकडून मलिक यांच्याशी संबंधित कंपनीने ही जागा विकत घेतल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्या संदर्भात पुरावे दिले होते. याच व्यवहारासंदर्भात नवाब मलिक यांची चौकशी सध्या सुरू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.