किरीट सोमैय्या यांना कराडमध्ये केले स्थानबद्ध

किरीट सोमैय्या यांना कराडमध्ये केले स्थानबद्ध

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांना महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरकडे जाताना कराड येथे स्थानबद्ध करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावर त्यांना अडविण्यात आले आणि कराडमधील सरकारी सर्किट हाऊसमध्ये त्यांना नेण्यात आले.

किरीट सोमैय्या हे ठाकरे सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संपत्तीविषयी कागदपत्रे व पुरावे गोळा करत असून त्यासंदर्भात ते कोल्हापूरला जात होते. त्याआधी, मुंबईतील मुलुंड येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आणि त्यांना स्थानबद्ध करण्यात आले पण सोमैय्या यांनी कोल्हापूरला जाण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार ते ७.३०च्या गाडीने कोल्हापूरला रवाना झाले होते. ठिकठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अखेर कराड येथे सोमवारी सकाळी त्यांना अडविण्यात आले आणि कराडच्या सर्किट हाऊसला नेण्यात आले.

कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असून २० व २१ सप्टेंबरला सोमैय्या यांनी तिथे जमाव एकत्र करू नये असे आदेश काढण्यात आले आहेत. १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

यासंदर्भात रविवारी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली होती. आणीबाणीसदृश परिस्थिती असल्याची टीकाही सरकारच्या या कृतीनंतर होऊ लागली.

सोमैय्या यांनी सातत्याने महाविकास आघाडीतील मंत्री व नेत्यांविरोधात मोहीम उघडली आहे. अनिल देशमुख, अनिल परब यांच्या संपत्तीसंदर्भात त्यांनी सातत्याने माहिती उघड केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे.

Exit mobile version