सोमय्यांनी पवारांविरुद्ध थोपटले दंड
सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी घोटाळे केल्याचे आरोप भाजप नेते किरीट सोमय्या करत आहेत. संबंधित घोटाळ्यांचे पुरावेही असल्याचे त्यांचे म्हणणे असते. अनेकदा त्यांनी केलेल्या आरोपांनंतर ईडी, सीबीआय अशा एजन्सीने त्या प्रकरणांवर तपासही केला आहे. किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे निकटवर्तीय आणि बहिणींच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (१६ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत बोलताना प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आता किरीट सोमय्या यांनी थेट शरद पवारांना आव्हान दिले आहे. पवार कुटुंब जनतेला लुटण्याच काम करत आहे आणि मी त्यांना उघडे पाडण्याचे काम करत आहे, असे सोमय्या यांनी सोलापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
अजित पवारांवर केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे सोमय्या ईडी आणि आयकर विभागाला पाठवणार आहेत. हे पुरावे खोटं असल्याचे शरद पवारांनी सिद्ध करावे, असे आव्हान सोमय्यांनी पवारांना दिले आहे. शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी हे आरोप खोटे असल्याचे सिद्ध करावे, असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
पुण्यात गाडीने पोलिसाला ८०० मीटर फटफटत नेले
‘तुष्टीकरणाविरोधात आवाज उठवल्यावर सत्ताधारी शिवसेनेने पळ काढला…’
भारतातील बैठकीसाठी पाकिस्तानलाही दिले निमंत्रण
‘टीके से बचेगा देश’…भारताचे वॅक्सीन अँथेम ऐकलेत का?
अजित पवारांनी आयकर विभागाची धाड पडल्यानंतर विधान केले होते की, ‘माझ्या बहिणींचा काहीही संबंध नसताना ईडी चौकशी करत आहे. मात्र, अजित पवारांच्या बहिणी आणि त्यांचे मेहुणे जरंडेश्वर कारखान्यात पार्टनर आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेशी बेईमानी केली की आपल्या बहिणींशी बेईमानी केली?’, असे किरीट सोमय्या म्हणाले.
बहिणींच्या नावाने कंपन्यांमध्ये भागिदारी आहे, संपत्ती आहे. आपण म्हणता त्यांचा काही संबंध नाही. मग बहिणींच्या नावाने देखील बेनामी संपत्ती केली का? ते शरद पवारांना मान्य आहे का? असा थेट सवाल करत सोमय्यांनी पुरावे खोटे असल्याचे सिद्ध करावे, असे पवारांना आव्हान दिले आहे.