कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप असून या संदर्भात मुंबई महापालिकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीकडून नोटीस आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
काय आहे हे प्रकरण?
कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाला असून या संदर्भात मुंबई महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीकडून नोटीस आल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. हा संपूर्ण घोटाळा १०० कोटी रुपयांचा असून यामध्ये बेनामी कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. त्या संदर्भात आता ईडी अधिकाऱ्याने मुंबई महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोलावलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
किरीट सोमय्यांचा दावा
कोरोना काळात महानगरपालिके कडून कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्यासाठी बाहेरील कंपन्यांना कंत्राट देण्यात आले होते. यामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला वरळी आणि दहिसर या जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट देण्यात आले होते.पण ही कंपनीच बोगस असल्याचा आणि कोणताच वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव नसल्यास दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
नेमके आरोप काय?
कोरोना काळात मुंबईत जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यासाठी विविध कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आली होती यामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. महापालिकेचे हे कंत्राट मिळण्यासाठी कंपनीने बनावट कागदपत्र महानगरपालिकेकडे सादर केले असल्याचादावा किरीट सोमैय्या यांनी केला आहे. ही बनावट कंपनी संजय राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या नावावर आहे.या कंपनीची स्थापना जून २०२० मध्ये झाली. डॉक्टर हेमंत गुप्ता, सुजीत पाटकर, संजय शाह ,राजू साळुंखे अशी भागीदार असलेल्यांची नावे आहेत आणि महानगरपालिकेला सादर केलेली पार्टनरशिप डीड पूर्ण खोटी आणि बनावट असल्याचेही समोर आले आहे.
या कंपनीकडे पुरेसा स्टाफ नसून एमडी डॉक्टर, ज्युनिअर, इंटर्न डॉक्टर नेमल्याचे आणि कंत्राटामधील अटी आणि शर्तींचा भंग केल्याचे निदर्शनास आले आहे. कंपनी नवीन असून कोणताच अनुभव नसतानाही कंत्राट दिल्याचं निदर्शनास आलं आहे.त्यानंतर पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाने कंपनीला टर्मिनेट करुन २५ लाख रक्कम जप्त केली आहे. या कंपनीला कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे आदेश असताना सुद्धा मुंबई महापालिकेने या कंपनीला कंत्राट का दिले अशी माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा:
गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास
कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती
मनसेचे मुंबई महापालिका आयुक्तांवर आरोप
आता यावर मुंबई महापालिका आयुक्तांनी या सगळ्याची जबाबदारी घेऊन झालेल्या आरोपांवर उत्तर द्यावीत, ईडी चौकशीला सामोरे जावे, शिवाय याआधीच्या सरकारमध्ये कोणाच्या सांगण्यावरुन हे कॉन्ट्रॅक्ट दिले हे सुद्धा समोर येणे गरजेचे अशी मागणी मनसेने केली आहे. महानगरपालिकेच्या कोरोना काळातील व्यवहाराची चौकशी कॅगकडून सुरु असतानाच, आता कोविड सेंटर घोटाळ्याच्या आरोपात ईडीकडून महानगरपालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची चौकशी केली जात असेल तर खरंच ही सगळी कंत्राटं कशा प्रकारे आणि कुणी मिळवली यामध्ये खरंच गैरव्यवहार झाला का? आणि जर घोटाळा झाला असेल तर यात आणखी कोणाकोणाची नावं यामध्ये समोर येतात हे या तपास यंत्रणांच्या चौकशीनंतर समोर येईल हे नक्की