‘हैदराबाद येथील प्रचारसभेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ४० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या माझ्या वडिलांबद्दल अपशब्द वापरले,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. राजस्थानमधील नागौरमधील निवडणूक प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते. ‘काल काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी ‘मोदींच्या वडिलांबद्दल’ अपशब्द वापरले. काय झाले आहे काँग्रेसला? खरगेजी तुम्ही तर असे कधी नव्हता,’ असे मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी माझा भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरूच राहील, असा विश्वास उपस्थितांना दिला.
‘प्रिय बंधू आणि भगिनींनो, ते मला शिविगाळ करोत किंवा माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवोत, पण मी तुम्हाला आश्वासन देतो की, माझा भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरूच राहील. प्रत्येक भ्रष्टाचारी व्यक्तीला शिक्षा मिळेल,’ असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
आदल्या दिवशी भरतपूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत मोदी यांनी भाजप राज्यात सत्तेत आल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतला जाईल, असे आश्वासन दिले. राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार शेजारच्या उत्तर प्रदेश, हरियाणा आणि गुजरात राज्यांपेक्षा प्रति लिटर ११ रुपये अधिक आकारत असल्याचा आरोप मोदींनी केला. ‘हे सरकार सर्वसामान्यांची लूट करून काँग्रेस नेत्यांच्या तुंबड्या भरत आहे. मात्र लोकांच्या हितासाठी पेट्रोल आणि डिझेलदराचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल,’ असे आश्वासन मोदी यांनी दिले.
हे ही वाचा:
मणिपूरमध्ये स्वतंत्र सरकार स्थापन करण्याची धमकी देणारा मुआन टॉम्बिंगविरुद्ध गुन्हा
चॅट जीपीटीची पालक कंपनी ओपन एआयच्या सीईओला दाखविला बाहेरचा रस्ता
भारतीय क्रिकेट टीमचे ‘भगवे’ टी शर्ट ममता बॅनर्जींना नकोसे
मोहम्मद शमीच्या ट्रोलिंगमागे पाकिस्तानचा कट
देशाच्या मुख्य माहिती आयुक्तपदी पहिल्यांदाच दलित व्यक्तीची नियुक्ती जाहीर करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीवर काँग्रेसने बहिष्कार घातल्याबद्दल मोदी यांनी काँग्रेसवर टीका करून काँग्रेस दलितविरोधी असल्याचा आरोप केला. ‘ते एका दलित मातेचे सुपुत्र होते आणि भरतपूरमधील दीग गावचे होते. एका वरिष्ठ पदावर दलित व्यक्ती आहे, हे काँग्रेस बघू शकत नाही. त्यांनी राष्ट्रपतिपदासाठी रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीलाही विरोध केला होता. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनाही राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपने तुमच्याच राज्यातून अर्जुन मेघवाल यांच्या रूपात देशाला दुसरा दलित कायदा मंत्री दिला,’ अशी आठवण मोदी यांनी करून दिली.