हिमाचल प्रदेशच्या विधान सभेच्या प्रवेशद्वारावर तसेच संरक्षक भिंतीवर खलिस्तानी झेंडे फडकल्यामुळे त्याची चर्चा सुर झाली आहे. रविवारी सकाळी हे झेंडे हिमाचल प्रदेश विधानसभेच्या प्रवेशद्वारावर दिसले. त्याची छायाचित्रे आता व्हायरल झाली आहेत.
कांगरा पोलिस स्टेशनला याची माहिती देण्यात आली असून खलिस्तानच्या घोषणाही भिंतीवर लिहिण्यात आल्याचे दिसले आहे. धरमशालापासून लांब ही विधानसभा असून तिथे ही घटना घडली आहे.
उपायुक्त डॉ. निपुण जिंदाल यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, पोलिस जवळपासच्या सीसीटीव्हीची तपासणी करत असून त्यातून हे झेंडे कुणी लावले त्यांची माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
जिंदाल यांनी सांगितले की, तापिवन येथे असलेल्या विधानसभेच्या संरक्षक भिंतीवर तसेच मुख्य प्रवेशद्वारावार काही समाजकंटकांनी हे ध्वज लावल्याचे स्पष्ट झाले आहे. खलिस्तान झिंदाबादच्या घोषणाही त्यावर लिहिलेल्या आहेत. हे झेंडे आता उतरविण्यात आले आहेत आणि भिंतीवर लिहिलेल्या घोषणाही पुसून टाकण्यात आल्या आहेत. पोलिसांना यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा:
‘ठाकरे सरकराने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या’
सलमान म्हणतो, ‘आनंद दिघे आणि माझ्यात हे साम्य’
‘उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी’
गुणरत्न सदावर्ते यांचे टार्गेट आता ‘एसटी बँक’
पंजाबमधील काही पर्यटकांनी हे कृत्य केल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. अशा अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी हे कृत्य करणाऱ्यांना आव्हान दिले आहे की, तुम्ही दिवसाच्या प्रकाशात हे कृत्य करून दाखवा. रात्रीच्या अंधारात भेकडांसारखे काय काम करता.
ठाकूर यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, खलिस्तानी झेंडे लावणाऱ्यांच्या भेकड कृतीचा आम्ही निषेध करतो. विधानसभेत आता अधिक कडक सुरक्षाव्यवस्थेची आवश्यकता आहे, अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, २६ एप्रिलला अशा घटनेचे संकेत गुप्तचर यंत्रणांनी दिले होते, अशी माहितीही पुढे येत आहे.
त्याआधी, हिमाचल प्रदेशमध्ये भिंद्रनवाले आणि खलिस्तानी झेंडे नेणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली. या संघटनेने २९ मार्चला झेंडे लावण्याचे कळवले होते.