राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकासाठी मतदान करण्याची संधी आता मिळणार नाही. पीएमएलए न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. एक दिवसासाठी मतदानाकरिता आपल्याला जामिन मिळावा अशी विनंती या दोन्ही नेत्यांनी केली होती. पण न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. पण यात अभिनेत्री केतकी चितळेने केलेली हस्तक्षेप याचिकाही महत्त्वाची ठरली. विशेष सीबीआय न्यायालयात तिने अनिल देशमुख यांना जामिन मिळू नये यासाठी हस्तक्षेप याचिका केली होती. त्याचाही फटका या दोन्ही नेत्यांना बसला असावा.
केतकी चितळेने राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासंदर्भात केलेल्या एका पोस्टवरून सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. तिला १५ मेपासून अद्याप जामीन मिळालेला नाही. शिवाय, कळंबोली पोलिस स्टेशनमधून नेण्यात येत असताना तिच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यासंदर्भात एफआयआर देखील दाखल केला जात नाही. त्यामुळे तिच्या वकिलांनी सीबीआय न्यायालयात अर्ज करून देशमुख यांनाही जामीन मिळू नये, अशी विनंती केली होती. सीबीआयकडून पुढील काही दिवस कोणतीच सुनावणी नसल्यामुळे ही याचिका पीएमएलए न्यायालयात वर्ग करण्यात आली होती. देशमुख यांना मतदानासाठी जामीन मिळू नये, असे केतकीचे म्हणणे होते.
हे ही वाचा:
विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी भाजपाकडून सदाभाऊ खोत
….म्हणून चीनने केले भारताचे कौतुक
१८ जुलैला होणार राष्ट्रपती पदासाठी निवडणूक
‘मुख्यमंत्र्यांचे भाषण एमआयएमची मतं मिळवण्यासाठी’
तिने याचिकेत म्हटले होते की, जर पोलिसांच्या संरक्षणात असतानाही माझ्यावर हल्ला झाला तर देशमुखांना मतदानासाठी नेले जात असताना तिथेही असाच हल्ला करून देशमुख यांना फरार होण्यास मदत केली जाऊ शकते. शिवाय, फार मोठा गुन्हा केलेला नसताना मला जामीन मिळत नाही पण मनीलॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असताना देशमुख यांना एका दिवसासाठी कसा काय जामीन दिला जाऊ शकतो? या सगळ्या मुद्द्यांचा परिणाम आता देशमुख आणि मलिक यांच्या जामीनासाठी केलेल्या याचिकेवर झालेला असू शकतो. अर्थात, केतकीची जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली आहे.