केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरिफ खान म्हणाले की, “विजयन यांनी मला शारीरिक इजा करण्याचा कट रचला आहे.” राज्यपालांची गाडी विमानतळाच्या दिशेने जात असताना, भारतीय कम्युनिस्ट पार्टीची (सीपीएम) विद्यार्थी शाखा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने गाडीला धडक दिली. या घटनेनंतर राज्यपालांनी थेट केरळच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यपाल दिल्लीसाठी तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर जात असताना ही घटना घडली.
अपघातानंतर राज्यपाल माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री विजयन यांनी इजा करण्याचा कट रचला आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपली माणसे पाठवली होती. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आणि घटनात्मक मूल्ये कमकुवत होत आहेत. एखाद्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरू असेल आणि आंदोलकांच्या गाड्या तेथे आल्या, तर त्या गाड्यांना पोलीस कार्यक्रमस्थळी येऊ देणार का? मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ कोणालाही जाऊ देणार का? मात्र, येथे पोलिसांनी त्यांना तशी परवानगी दिली. तसेच पोलिसांनी त्यांना आत ढकलून आंदोलकांना पळून जाऊ दिले.
राज्यपाल आरिफ खान म्हणाले की, जर मुख्यमंत्री विजयन आणि माझे कोणत्याही मुद्द्यावर एकमत होत नसेल तर याचा अर्थ असा नाही की, “ज्येष्ठ मार्क्सवादी नेते मला दुखावण्याचा कट रचत आहेत. आंदोलकांनी केवळ माझा विरोध केला नाही किंवा काळे झेंडे घेऊन शांत बसले नाही. त्यांनी माझ्यावर दोन्ही बाजूंनी हल्ला केला. त्यानंतर मी माझ्या गाडीतून बाहेर आलो, पण ते (आंदोलक) तेथून का पळून गेले? हे माहित नव्हते. तसेच हे सर्वजण एकाच गाडीतून आल्याचे पोलिसांना माहीत होते.”
हे ही वाचा :
हमासची उत्तर गाझामध्ये शरणागती… इस्रायलचा दावा
कॉलेजमधील विद्यार्थी नेता ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
रुग्णालयाच्या शौचालयात फेकले बाळाला!
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी ६० तास होणार पूजन
माहितीनुसार, मोहम्मद खान यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांना तीन ठिकाणी आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले होते. यापैकी दोन ठिकाणी त्यांच्या गाडीला धडक बसली, असे पोलिसांनी सांगितले. विद्यार्थी संघटनेच्या सात कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.