दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी जबरदस्त दणका बसला आहे. उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती दिली आहे. ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय. त्यामुळे दारू घोटाळ्यात अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील राऊज एवेन्यू न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला होता. मात्र, या निर्णयाविरोधात ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत जामिनाला विरोध केला होता. सुनावणी सविस्तर झाली नसल्याचे म्हणणे ईडीकडून मांडण्यात आले होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती दिली. त्यानंतर जामीन स्थगित करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र, जामिनावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत जामीन देता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं.
दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामिनासंदर्भात अंतिम निकाल मंगळवार, २५ जून रोजी दिला असून दिल्लीच्या राऊज एवेन्यू न्यायालयाने दिलेल्या जामिनावर दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती कायम ठेवली आहे. तसेच या प्रकरणात सविस्तर सुनावणी होण्याची गरज असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. या सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टावर ताशेरे ओढले आहेत.
हे ही वाचा:
पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर
लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला विरुद्ध के.सुरेश मैदानात!
बिर्यानीत लेग पीस नसल्याने लग्नात झाला राडा !
“आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसला राज्यघटनेवर प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार नाही”
ट्रायल कोर्टाचे विशेष न्यायाधीश यांनी २० जून रोजी केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. त्यावेळी केजरीवाल यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांना देश सोडून न जाणे आणि साक्षीदार किंवा पुराव्यावर प्रभाव टाकू नये अशा अटींसह हा जामीन देण्यात आला होता. गुरुवारी रात्री आठ वाजताच्या निर्णयानंतर केजरीवाल यांची शुक्रवारी सुटका होणार होती. पण त्यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना २१ मार्च रोजी कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी न्यायालयाने त्यांना २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्यांना २ जून रोजी आत्मसमर्पण केल्यानंतर पुन्हा तुरुंगात जावे लागले.