अण्णा हजारे बोलले, केजरीवाल यांची केली पोलखोल

ईडीकडून झालेल्या अटकेनंतर व्यक्त केली भूमिका

अण्णा हजारे बोलले, केजरीवाल यांची केली पोलखोल

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. गुरुवार, २१ मार्च रोजी त्यांना अटक करण्यात आली. यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि पूर्वी अरविंद केजरीवाल यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं असे अण्णा हजारे यांनीही अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली आहे. अण्णा हजारे यांचा अरविंद केजरीवाल यांचे गुरू मानले जाते अशातच त्यांनी अटकेच्या कारवाईनंतर केजरीवाल यांना खडेबोल सुनावले आहेत.

केंद्रातल्या तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन उभं करणाऱ्या अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे म्हणाले की, “अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याचं ऐकून वाईट वाटलं. अरविंद केजरीवाल यांच्यासारखा माणूस कधी काळी माझ्याबरोबर काम करत होता. त्यावेळी दारुविरोधात आवाज उठवला होता. तोच माणूस आता मद्य धोरण बनवत आहे, हे पाहून मला खूप दुःख झालं. परंतु, आपण आता काय करू शकतो? सत्तेसमोर काहीच चालत नाही. मद्य धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक झाली, हे सगळं त्यांच्या कृतीमुळे झालं आहे. त्यांनी ते सगळं केलं नसतं तर अटकेचा संबंधच नव्हता. आता जे होईल ते कायद्याच्या दृष्टीने होईल आणि सरकार पाहून घेईल,” अशी टीकात्मक प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली. अरविंद केजरीवाल यांची या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू होती. ईडीने त्यांना तब्बल नऊ वेळा समन्सही पाठवले होते. परंतु, केजरीवाल यांनी चौकशीला जाणं टाळलं होतं. अखेर गुरुवारी रात्री त्यांना ईडीनं अटक केली.

हे ही वाचा:

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत १६ जणांना अटक!

ऐतिहासिक यश; इस्रोच्या ‘पुष्पक’ची यशस्वी चाचणी!

‘आप’च्या समोर नेतृत्वाचे संकट

‘जावेदने साजिदला माझ्या घरी आणले; त्याची आमच्यासमोर चौकशी करा’

अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल आंदोलना’त अरविंद केजरीवाल हे आघाडीवर होते. परंतु, आंदोलन चालू असतानाच केजरीवाल यांनी राजकारणात यायचं ठरवलं, त्यामुळे अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्यात बिनसलं. त्यानंतर या दोघांचे मार्ग बदलले. पुढे केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी हा पक्ष काढला. सध्या हा पक्ष दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत आहे.

Exit mobile version