दिल्लीतील मद्यघोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना राजीनामा न देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे जर त्यांना अटक झाल्यास ते तुरुंगातून सरकार चालवतील, असे ‘आप’नेत्या आतिशी यांनी सांगितले.
दिल्ली मद्यघोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी केजरीवाल यांना नोटीस पाठवल्यावर हा केजरीवाल यांना तुरुंगात डांबण्याचा कट असल्याचा आरोप ‘आप’ने केला होता. ईडीच्या समन्सच्या पार्श्वभूमीवर ‘आप’चे आमदार आणि केजरीवाल यांच्यात चर्चा झाली. तेव्हा सर्व आमदारांनी केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा देऊ नये, अशी विनंती त्यांना केल्याचे दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी सांगितले.
‘दिल्लीकरांनी केजरीवाल यांना मते दिली आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी विनवणी आम्ही त्यांना केली आहे. जर ते तुरुंगात गेले, तरीही ते दिल्लीचे मुख्यमंत्री असतील. आम्ही कॅबिनेट बैठका तुरुंगात घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊ. दिल्लीचे सरकार तुरुंगातून चालेल,’असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. अरविंद केजरीवाल लवकरच पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतील, अशी माहिती ‘आप’चे सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनी दिली.
ईडीने २ नोव्हेंबरला मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना चौकशीसाठी येण्याची नोटीस पाठवली होती. मात्र हे समन्स बेकायदा आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करून केजरीवाल यांनी चौकशीला हजर राहण्यास नकार दिला होता. तसेच, हे समन्स भाजपच्या सांगण्यावरून पाठवले गेल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
हे ही वाचा:
जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!
भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त
‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!
जम्मू-काश्मीरमधील लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या लश्करच्या कमांडरचा शिरच्छेद!
मद्यघोटाळ्यापरकरणी याआधीच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांना अटक केली आहे. एप्रिलमध्ये याच प्रकरणात सीबीआयने केजरीवाल यांची नऊ तास चौकशी केली होती.