दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ईडीने मद्यधोरण गैरव्यवहाराप्रकरणी २ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. याच प्रकरणी यंदा एप्रिलमध्ये सीबीआयनेही केजरीवाल यांची चौकशी केली होती. मात्र १७ ऑगस्टला दाखल झालेल्या आरोपपत्रात केजरीवाल यांचे नाव नाही.
मद्यधोरण गैरव्यवहाराप्रकरणी याआधीच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना याच वर्षी फेब्रुवारीमध्ये तर, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना ४ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. संजय सिंह यांना १० नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मनीष सिसोदिया यांचा जामीन फेटाळल्यानंतर अवघ्या काही तासांतच ईडीने केजरीवाल यांना समन्स बजावले आहे. मनीष सिसोदिया मद्यधोरण प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत.
केजरीवाल यांची याच वर्षी एप्रिलमध्ये मद्यधोरण प्रकरणात सीबीआय चौकशी करण्यात आली होती. मात्र सीबीआयने ऑगस्ट महिन्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांचे नाव नव्हते. त्यावेळी केजरीवाल यांची भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट या प्रकरणात नऊ तासांहून अधिक तास चौकशी झाली होती. ईडीने पाठवलेल्या समन्सबद्दल आपचे नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘भाजपचा एकमेव उद्देश आम आदमी पक्षाला कोणत्याही परिस्थितीत संपवणे हा आहे,’ अशी टीका त्यांनी केली. ‘त्यांना (भाजपला) केजरीवाल यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून आप पक्षाला संपवायचे आहे,’ असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
जर्मन टॅटू कलाकार शानी लूक हिचा हमासकडून शिरच्छेद
केरळ स्फोट; आरोपीला दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अटक
अफगाणिस्तानने आता वर्ल्डकपविजेत्या श्रीलंकेलाही नमवले
ललित पाटील प्रकरणात ससूनमधील कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा
आपच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने आणलेल्या मद्यधोरणामुळे आर्थिक गैरव्यवहार झाला. तसेच, काही जणांकडून पैसे घेऊन मद्यपरवाने दिल्याचा आरोप ईडी आणि सीबीआयने केला आहे. तर, केजरीवाल आणि पक्षाने हे आरोप फेटाळले असून महसूल वाढावा, यासाठी नवीन धोरण आणल्याचा दावा त्यांनी केला आहे.