‘अरविंद केजरीवाल जिथेही निवडणूक प्रचाराला जातील, लोकांना त्यांच्यात दारूची मोठी बाटलीच दिसेल,’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. केजरीवाल यांना हंगामी जामीन मिळाल्यामुळे इंडि आघाडीला फायदा झाला का, असा प्रश्न शहा यांना विचारला असता, त्यांनी ‘आप’चा समाचार घेतला.
‘एक मतदार म्हणून मी असे मानतो की, केजरीवाल जिथे जिथे जातील, तिथे लोकांना मद्यघोटाळा आठवेल. त्यामुळे कोणाला फायदा होईल, कोणाला नुकसान, मला नाही समजत. मात्र लोक जेव्हा केजरीवालांना पाहतील, तेव्हा त्यांना मोठी बाटली दिसेल,’ असे शहा म्हणाले.
‘मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. परंतु या निर्णयाला ज्या प्रकारे आम आदमी पक्ष आणि काही पत्रकार केजरीवाल हे याला केजरीवाल यांचा विजय मानत आहेत, तसे मी मानत नाही. सर्वोच्च न्यायालयात केजरीवाल असा अर्ज करत गेले होते की, ही अटक बेकायदा आहे, मात्र हे न्यायालयाने मानले नाही. इतकेच नव्हे तर नियमित जामीन अर्जही फेटाळून लावला. त्यानंतर जेव्हा हंगामी जामीन मागितला, तेव्हा तो अटी-शर्तींसह देण्यात आला. जर त्यांना स्वतःवर इतकाच विश्वास होता तर त्यांनी सत्र न्यायालयात जावे आणि त्यांच्यावरील आरोप चुकीचे आहेत, अशी याचिका करावी,’ असे शहा यांनी स्पष्ट केले.
भाजप देशाची राज्यघटना बदलेल, या विरोधकांच्या आरोपांचाही त्यांनी समाचार घेतला. ‘आमच्याकडे गेल्या १० वर्षांपासून राज्यघटना बदलण्यासाठी पुरेसा जनादेश आहे. देशाच्या नागरिकांनी आम्हाला हा जनादेश दिला आहे. राहुलबाबा आणि कंपनी जे काही सांगेल, देश त्यावर विश्वास ठेवेल, असे नाही,’ असेही ते म्हणाले.
शाह यांनी सांगितले की, ४०० पार का हवेत?
‘आम्हाला ४०० जागा हव्यात कारण देशाला आम्ही अधिक राजकीय स्थिरता देऊ शकू. आम्हाला ४०० जागा हव्यात कारण आम्हाला सीमा आणखी सुरक्षित करायचे आहे… जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवायचे आहे. जो कोणी गरीब आहे, त्यांना गरिबीतून बाहेर काढायचे आहे. प्रत्येक घरात स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी आम्हाला ४००जागा हव्या आहेत. सर्व ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळावेत आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी आम्हाला ४०० जागा हव्या आहेत,’ असे शहा म्हणाले.
हे ही वाचा:
कन्हैया कुमार यांना हार घालण्याच्या बहाण्याने मारहाण
मुंबईकरांनो रेकॉर्डब्रेक मतदान करा…देशात सगळे जुने विक्रम तुटणार आहेत
“तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलंय”
‘आम्हाला ३००पेक्षा अधिक जागा मिळाल्या. १० वर्षांत आम्ही तीन तलाकला हटवले. कलम ३७० हटवले. राम मंदिर बनवले. राज्यघटना बदलायची असो वा मोठा निर्णय घ्यायचा असो, ते आम्ही आताही करू शकतो. आम्ही संसदेत जी वचने दिली होती, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही बहुमताचा वापर केला,’ असे शहा यांनी स्पष्ट केले.