फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणुका पार पडणार असून या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजप नेते वीरेंद्र सचदेवा यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना नववर्षानिमित्त खास पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी केजरीवालांना खोचक सल्ला दिला आहे. केजरीवाल यांनी खोटे बोलण्याची आणि फसवणुकीची वाईट सवय सोडून द्यावी, असं त्यांनी पत्रात म्हटले आहे.
“आपण सर्व लहानपणापासून नवीन वर्षाच्या दिवशी वाईट सवयी सोडून काहीतरी चांगले आणि नवीन करण्याचा संकल्प करतो. आज, नवीन वर्ष २०२५ च्या पहिल्या दिवशी, सर्व दिल्लीवासीयांना आशा आहे की तुम्ही ते घडवून आणाल. खोटे बोलणे आणि फसवणूक करण्याच्या वाईट सवयी सोडून स्वतःमध्ये अर्थपूर्ण बदल करा,” असे भाजपा नेते वीरेंद्र सचदेवा यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.
याशिवाय त्यांनी केजरीवाल यांना पाच संकल्प ठरविण्यास सांगितले आहे. दिल्लीतील दारूला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्लीतील जनतेची माफी मागावी. महिला, वृद्ध आणि लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळणे केजरीवाल यांनी थांबवावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे. पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, मला विश्वास आहे की तुम्ही तुमच्या मुलांवर पुन्हा कधीही खोटी शपथ घेणार नाही. यमुना मातेच्या स्वच्छतेबाबत दिलेल्या खोट्या आश्वासनाबद्दल आणि भ्रष्टाचाराच्या अक्षम्य गुन्ह्याबद्दल तुम्ही जाहीरपणे माफी मागाल. तुम्ही राष्ट्रविरोधी शक्तींकडून राजकीय फायद्यासाठी देणग्या न घेण्याची शपथ घ्याल. सचदेवा यांनी पुढे सल्ला दिला आहे की, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी स्वतःला सुधारून लबाडी आणि फसवणूक यापासून दूर राहावे.
हे ही वाचा :
‘हे वर्ष नवीन संधी, अनंत आनंद घेऊन येवो’
मणिपूरच्या इंफाळमध्ये अतिरेक्यांकडून गोळीबार आणि बॉम्ब हल्ला!
आत्मसमर्पण केलेल्या वाल्मिक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी
ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्यामागील हमासचा प्रमुख कमांडर ड्रोन हल्ल्यात ठार
दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहित भारतीय जनता पक्षाच्या कृतींशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आरएसएसला भाजप लोकशाही कमकुवत करत आहे असे वाटते का? असा प्रश्न विचारत केजरीवाल यांनी भाजपचे आचरण आणि त्याचा लोकशाहीवर होणारा परिणाम यासंबंधी विविध मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले आहे.