राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री धंनजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपातून बाहेर येतात न येतात ते लगेच पुन्हा नव्या अडचणीत सापडले आहेत. धंनजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा – मुंडे यांनी धंनजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. “धनंजय मुंडे यांनी आपल्या दोन्ही मुलांना जबरदस्तीने डांबून ठेवले आहे.” असा गंभीर आरोप करुणा यांनी तक्रारीत केला आहे. पोलिसांनी कारवाई नाही केली तर २० फेब्रुवारी पासुन आमरण उपोषणाला बसणार असल्याचेही करूणा यांनी म्हटले आहे.
करुणा मुंडे यांनी बुधवारी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. “गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी आपल्या दोन मुलांना चित्रकूट या बंगल्यावर जबरदस्तीने ठेवले आहे. मला त्यांना भेटू दिले जात नाही किंवा फोनवरही बोलू दिले जात नाही.” असे करुणा यांचे म्हणणे आहे. २४ जानेवारी रोजी करुणा या आपल्या मुलांना भेटण्यासाठी चित्रकूट बंगल्यावर गेल्या असताना ३० – ४० पोलिसांना बोलवून त्यांना अटकाव करण्यात आला.
“धंनजय मुंडे यांचे चारित्र्य नीट नाहीये. माझ्या १४ वर्षांची छोटी मुलगी सुरक्षित नाहीये.” असे करूणा यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.
काही दिवसांपूर्वी करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. त्यांच्याविरोधात तक्रार देखील केली होती पण कालांतराने त्यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे.