धनंजय मुंडेंचे इतके बंगले असताना ‘मनोरा’ची गरज काय?

धनंजय मुंडेंचे इतके बंगले असताना ‘मनोरा’ची गरज काय?

पत्नी करुणा शर्मा-मुंडेंनी विचारलेल्या सवालामुळे नवा वाद

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा शर्मा-मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आपले पती धनंजय मुंडे यांचे मुंबई, पुणे, परळी (बीड) येथे बंगले आणि घरे असताना  मुंबईतील मनोरा या आमदार निवासाच्या बांधकामासाठी ९०० कोटींचा खर्च करण्याची आवश्यकता काय, असा सवाल करुणा मुंडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

फेसबुक लाइव्हमध्ये करुणा मुंडे यांनी हा प्रश्न उपस्थित करताना मनोराच्या नूतनीकरणासाठी लागणारे पैसे हे गोरगरीबांसाठी वापरावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. पण यानिमित्ताने एका आमदाराची किती संपत्ती असू शकते, याचीही चर्चा होऊ लागली आहे.

हे ही वाचा:

आठवड्याला ५५ तासांपेक्षा अधिक काम ठरते मृत्युचे कारण

काँग्रेस गिधाडांप्रमाणे प्रेतांवर नजर ठेवून आहे

कोरोनाला ‘इंडियन व्हायरस’ म्हणत चीनी देणग्यांची परतफेड

सुशीलकुमारचा ठावठिकाणा सांगा आणि मिळवा १ लाख

करुणा मुंडे म्हणतात की, आपले पती मंत्री आणि आमदार असल्यामुळे त्यांना आणखी एका सरकारी मदतीची आवश्यकताच काय? त्यांचे परळी (बीड) येथे तीन बंगले, एक फार्म हाऊस आहे. पुण्यात दोन मोठे बंगले आहेत तर मुंबईतही त्यांचे दोन फ्लॅट आहेत. शिवाय, आता मंत्री म्हणूनही सरकारी निवासस्थान मिळालेले आहेच. मंत्री होण्याआधीच आमदार म्हणून माझ्या पतीने एवढे सगळे केले आहे. मग आता मनोरासारख्या आमदार निवासासाठी आणखी खर्च कशाला? सरकारने हे पैसे विधायक कार्यासाठी वापरावे.

करुणा मुंडे म्हणतात की, मी एक समाजसेविका म्हणून विविध भागात फिरत असते. मालाडच्या धारावली येथे पिण्याचे पाणीही लोकांना मिळत नाही. तिथे शौचालयांची व्यवस्था नाही. लोकांसाठी शौचालय बनवले आहे पण त्याचे उद्घाटनच झालेले नाही. निवडणुकांचा विचार करून मग ते उद्घाटन केले जाणार आहे का? त्याऐवजी पोलिसांच्या जर्जर झालेल्या घरांसाठी खर्च करा. काही दिवसांपूर्वी मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीसाठी ३ हजार ६०० कोटी रुपये देण्यात आले. मी विधान परिषदेचे नेते राहिलेल्या आणि आता मंत्री असलेल्या माझ्या पतीचा बंगला पाहिलेला आहे. त्यासाठी डागडुजीची कोणतीही आवश्यकता नाही. मग हाच पैसा ज्यांना खरोखरच गरज आहे, त्यांच्यासाठी खर्च करता येणार नाही का?

करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. काही दिवसांपूर्वी करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत पुस्तक लिहिणार असल्याचे म्हटले होते. करुणा यांची बहीण रेणू यांनी मुंडेंवर आरोप केले होते आणि नंतर ते मागेही घेतले. त्यावेळी मुंडे यांनी करुणा या त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यांची दोन मुले आहेत हे त्यांनी मान्य केले होते. त्या मुलांना आपले नाव दिल्याचेही त्यांनी सांगितले होते. आता करुणा यांच्या या फेसबुक लाइव्हमुळे नवा वाद उत्पन्न होणार आहे.

Exit mobile version