कारंजाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कारंजाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी दीर्घ आजारामुळे निधन झालं. राजेंद्र पाटणी हे गेल्या दोन- तीन वर्षांपासून आजारी होते. मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

शुक्रवारी सकाळी आमदार राजेंद्र पाटणी यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या दोनही किडण्या फेल झाल्या होत्या. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते या आजाराने त्रस्त होते. आमदार पाटणी यांच्या निधनानंतर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहून श्रध्दांजली अर्पण केली आहे.

“विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो,” असा संदेश असणारी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी टाकली आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी पुन्हा ठरले जगभरातील सर्वांत लोकप्रिय नेते

नाइटक्लबने प्रवेश न दिल्याने भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा गारठून मृत्यू

शरद पवार यांच्या गटाला ‘तुतारीवाला माणसा’चे चिन्ह

मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

राजेंद्र पाटणी यांनी यापूर्वी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करत वाशिम जिल्हाध्यक्षपदासह आमदारकी मिळवली. मागच्या दोन-तीन वर्षांपासून ते आजारी असल्यामुळे मतदारसंघात त्‍यांचे सुपूत्र ज्ञानक पाटणी यांनी लक्ष घातले होते. ज्ञानक पाटणी हे भाजपा जैन प्रकोष्टचे उपाध्यक्ष म्हणून कार्य करतात. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविले असून आरोग्य शिबिरे आणि इतर उपक्रमात सहभागी होत असतात.

Exit mobile version