एकेकाळचे काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कपिल सिब्बल यांना समाजवादी पक्षाचे समर्थन लाभले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांना अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे. सिब्बल यांनी यापूर्वीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा कपिल सिब्बल हे संसदेत दिसणार असून या वेळी मात्र ते काँग्रेसचे लोकप्रतिनिधी नसतील. गेल्या काही काळापासून काँग्रेसचे नेतृत्व पक्षश्रेष्ठीं विरोधात नाराज पाहायला मिळत आहे. काहींनी काँग्रेस विरोधात थेट बंड पुकारले आहे, तर काहींनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या यादीत कपिल सिब्बल यांचे देखील नाव समाविष्ट आहे.
हे ही वाचा:
हिंदुस्तान झिंकमधील संपूर्ण हिस्सा विकणार सरकार
नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी
लाखाच्या कर्जासाठी लहान मुलांसह स्वतःच केली ऊसतोड
आता दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीनेही घालायचे हेल्मेट
१६ मे रोजी सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभेचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही गोष्ट स्पष्ट केली. कपिल सिब्बल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचे आभार मानले आहेत. “राज्यसभेचा अपक्ष उमेदवार बनल्यानंतर मला आनंद होत आहे. मला कायमच या देशात एक स्वतंत्र आवाज म्हणून पुढे यायचे होते. मला आनंद आहे की अखिलेश यादव यांनी माझेही विचार समजून घेतले. एखाद्या पक्षाचे सदस्य झाल्यावर आपण पक्ष शिस्तीने बांधले जातो.” असे सिब्बल यांनी म्हटले आहे. काँग्रेससोबत खटके उडाल्यामुळेच त्यांना कोणत्याही पक्षात जायचे नसल्याचे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.