गांधी कुटुंबाने आता काँग्रेसचे नेतृत्व सोडावे!

गांधी कुटुंबाने आता काँग्रेसचे नेतृत्व सोडावे!

ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांची मागणी

गांधी कुटुंबियांनी आता काँग्रेसचे नेतृत्व सोडावे, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी केले आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सिबल यांनी आपले हे मत व्यक्त केले आहे. अर्थात, अशी वक्तव्ये अनेकवेळा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केली असली तरी गांधी कुटुंबियांनी पक्षावरील आपली पकड कधीही ढिली केलेली नाही.

७३ वर्षीय सिबल यांनी म्हटले आहे की, गांधींनी पदांपासून स्वतःहून बाजुला व्हावे कारण काँग्रेसचा अध्यक्ष निवडण्यासाठी जी समिती तयार करण्यात आली आहे, ती गांधींना पदापासून दूर करण्यासाठी सांगू शकत नाही.

सिबल हे काँग्रेसमधील २३ बंडखोर नेत्यांपैकी एक आहेत.

२०२०मध्ये अशा २३ नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वाविरोधात स्वाक्षरी मोहिम राबविली होती. तसे पत्र त्यांनी सोनिया गांधींना लिहिले होते. त्यात काँग्रेसमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते आणि काँग्रेसला एक पूर्णवेळ अध्यक्ष असावा असेही त्यांनी म्हटले होते.

काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर चिंतन शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय झाला होता. त्यावर सिबल यांनी टीका केली. काँग्रेस पक्षाची गेल्या ८ वर्षांतील घसरण कशामुळे झाली, हे पक्षनेतृत्वाला ठाऊक नसेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात राहात आहेत. त्यापेक्षा चिंतन सगळ्यांनीच करू पण आता अन्य कुणाला तरी संधी द्या.

हे ही वाचा:

पर्यावरणासाठी उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘विवेकानंद सस्टेनेबिलिटी पुरस्कार’

ऑपरेशन गंगामुळे २२ हजाराहून अधिक नागरिक परतले भारतात

पंतप्रधान मोदी म्हणतात की, काश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनत राहिले पाहिजेत!

‘संजय राऊत यांच्या ईडीवरील आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी, अन्यथा न्यायालयात जाणार’

 

सिबल म्हणाले की, काँग्रेस कार्यकारिणीच्या बाहेरही काँग्रेस आहे. त्यांची काय भूमिका आहे याचाही विचार व्हावा. त्यांची भूमिका वेगळी असू शकते. आम्ही कार्यकारिणीत नाही म्हणजे आम्हाला काही किंमत नाही असे आहे का?

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची वाईट अवस्था झाली. उत्तर प्रदेशात त्यांना केवळ २ जागा मिळाल्या तर पंजाबात त्यांचे सरकार पडले आणि आम आदमी पार्टीने विजय मिळविला. गोव्यातही भाजपाने त्यांना मागे टाकले. या सगळ्या पराभवानंतरही काँग्रेसमध्ये नवे नेतृत्व येण्याची चिन्हे नाहीत, ही खंत काँग्रेसचे जुनेजाणते नेते व्यक्त करत आहेत.

Exit mobile version