शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाभवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर आरोप केले. त्यात मोहित कंबोज यांनाही त्यांनी लक्ष्य केले होते. मोहित कंबोज यांनी त्यावर त्वरित पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांना आव्हान दिले. कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आणि राऊत यांचेच कुणाकुणाशी असलेले संबंध उघड झाल्यामुळे त्यांना पत्रकार परिषदेत घाम फुटल्याचेही ते म्हणाले.
कंबोज म्हणाले की, राऊत हे खोट्या कहाण्या तयार करतात, भाजपा कार्यकर्त्यांवर आरोप करतात. राऊत यांनी सुरुवात केली की ते मला ओळखत नाहीत. मी तुम्हाला ४ सप्टेंबर २०१७ चे फोटो दाखवतो. ते माझ्या घरी आले होते. प्रत्येक वेळी माझ्याकडे गणपतीला येतात. अनेकवेळेला माझ्याकडून आर्थिक मदत मागितली ती मी केली. पण आता त्यांना स्मृतीभ्रंश झाला असावा.
राऊत यांनी मला फडणवीस यांचा निकटवर्ती दाखविले. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे पण राऊत यांची निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याशी आहे की पवारांशी आहे हे त्यांनी सांगावे. प्रवीण राऊत यांच्याशी असलेले संबंध उघड झाल्यामुळे आपल्याला आज घाम फुटला, असेही कंबोज म्हणाले.
कंबोज यांनी नंतर राऊत यांनी केलेल्या आरोपांची दखल घेतली. ते म्हणाले, माझ्यावर पहिला आरोप लावला तो म्हणजे गुरू आशीष. शासन तुमच्याकडे आहे. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेता तेव्हा अभ्यास करा. राकेश वाधवानकडून १२ हजार कोटींची जमीन म्हणजेच १ लाख ६५ हजार चौ. फूट जागा म्हणजे १० लाख रु. चौ. फूट या किमतीची जमीन, मी १०० कोटींना घेतली असा आरोप केला . मुंबईत अशी जमीन आहे का? मुंबईतच नव्हे तर जगात नाही. तुम्ही काय बोलत आहात. माझ्या कंपनीने गुरू आशीषसोबत जागेचा व्यवहार केला जमीन खरेदी केली २०१०मध्ये त्यात माझे पैसे बुडाले. मी त्यावर एफआयआर केला. तुमच्याकडे ईओडब्ल्यू आहे. त्यातली तक्रार बघा. मी माझ्याशीच चुकीचा व्यवहार केला आणि फसविले का? खोटे आरोप करू नका.
माझ्या अनेक कंपन्या त्यांनी सांगितल्या त्यात पैसे कुठून येतात असे त्यांनी विचारले. मी खुले आव्हान देतो की, त्यांनी चौकशी करावी मी प्रत्येक चौकशीला उत्तर देईन.
माझा प्रश्न आहे राऊतांना की, प्रवीण राऊत डीडीपीएल ग्लोबल इन्फ्रा प्रा. लि. नायगाव, वसई विरारमध्ये प्रवीण राऊत यांच्या फ्रंट मॅनने मॅन पॉवर, मसल पॉवर व संजय राऊत पॉवरचा वापर करून १७५ एकर लँड बिल्डरला विकली. भ्रष्टाचारविरोधी पथकाला कळविल्यावर त्यात काहीही निष्पन्न निघाले नाही. मी ही माहिती ईओडब्ल्यूला देईन. यासंदर्भात मीटिंग झाली तेव्हा प्रवीण राऊत यांच्यासोबत संजय राऊतही होते. १५०० कोटीला जमीन विकली गेली. प्रवीण राऊतना ७०० कोटी मिळाले. संजय राऊत यांना किती पैसे मिळाले हा प्रश्न त्यांना आहे, असेही कंबोज म्हणाले.
हे ही वाचा:
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार?
माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांचाही काँग्रेसला राम राम
किरीट सोमय्या यांच्या तक्रारीत आहेत या गोष्टी…
‘गौप्यस्फोटापेक्षा आपटी बार बरा असतो’
मी संजय राऊत यांच्याविरोधातही कायदेशीर कारवाई करणार आहे. त्यात ते नक्कीच तोंडावर पडतील. नवाब मलिक यांच्याप्रमाणेच त्यांना माफी मागावी लागेल.