कमलनाथ यांचा म.प्र. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा

कमलनाथ यांचा म.प्र. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी गुरुवारी मध्य प्रदेशमधील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसने त्यांचा राजीनामा स्वीकारला असून गोविंद सिंग हे आता विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

कमलनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी त्यांना पत्र लिहून कळविले आहे की, काँग्रेस अध्यक्षांनी तुमचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारला आहे. मध्य प्रदेश विधिमंडळाच्या विरोधी पक्षनेतेपदाचे तुमचे योगदान प्रशंसनीय आहे.

कमलनाथ यांनी २०१८मध्ये राज्यातील निवडणुका जिंकल्यावर मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. पण केवळ १५ महिन्यांसाठीच त्यांचे सरकार चालले. २०२०मध्ये त्यांचे सरकार पडले. अनेक विद्यमान आमदारांनी राजीनामे दिल्याने हे सरकार कोसळले. त्यानंतर जुलै २०२०मध्ये कमलनाथ यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारली.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात सापडलेल्या तलवारीच्या साठ्यासाठी गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का ?

‘राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावाने हजारो महिलांची फसवणूक’

आसाममध्ये पंतप्रधान मोदींनी सात कॅन्सर रुग्णालये केली समर्पित

केरळच्या कम्युनिस्ट सरकारलाही पडली मोदींच्या गुजरातची भुरळ

 

काँग्रेसने नुकतीच हरयाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब याठिकाणी नेतृत्वबदल केला होता. गेल्या काही वर्षांत काँग्रेसची देशभरात अवस्था वाईट झालेली आहे. पंजाबमध्ये तर आम आदमी पार्टीने सत्ता मिळविली आणि काँग्रेसचा सफाया झाला.

मध्य प्रदेशच्या काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कमलनाथ राहणार आहेत. त्यामुळे एक व्यक्ती एक पद यानुसार त्यांना विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे २०२३मध्ये मध्य प्रदेशात निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.

आता विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेले गोविंद सिंग हे भिंड जिल्ह्यातील आमदार आहेत. विद्यार्थी दशेतून त्यांनी राजकारण केलेले आहे. १९८५मध्ये ते भिंड नगरपालिकेचे अध्यक्षही होते. १९९०मध्ये ते प्रथम आमदार बनले. दिग्विजय सिंग सरकारमध्येही ते मंत्री होते. कमलनाथ यांच्या सरकारमध्येही ते सहकार मंत्री होते.

 

Exit mobile version