अयोध्येतील बाबरी मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त केल्यानंतर श्रीराम मंदिरासाठी मुख्यमंत्रीपदाच्या १०० खुर्च्यांचाही आपण त्याग करू, असे परखड विधान करत श्रीराम मंदिरासाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडणारे नेते म्हणून कल्याणसिंह हे कायम स्मरणात राहणार आहेत. श्रीराम मंदिर निर्माणात त्यांची भूमिका म्हणूनच अद्वितीय राहील. आज अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीने वेग घेतलेला असताना कल्याणसिंह यांचे जाणे हे म्हणूनच वेदनादायी आहे.
६ डिसेंबर १९९२ला जेव्हा बाबरी मशिदीचा ढाचा ध्वस्त झाला, तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री म्हणून कल्याणसिंह यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, असा आरोप केला गेला, पण कल्याणसिंह यांनी श्रीरामासाठी मुख्यमंत्रीपदाची एक खुर्ची काय अशा अनेक खुर्च्यांचा आपण त्याग करू, अशी घोषणा केली. हे सरकार राम मंदिरनिर्माणासाठी बनले होते आणि तो उद्देश आता सफल झाला आहे, असे उद्गार कल्याणसिंह यांनी तेव्हा काढले होते. कल्याणसिंह यांच्या या भूमिकेमुळे लवकरच ते भाजपातील एक लोकप्रिय चेहरा बनले. त्यामुळेच १९९७मध्ये पुन्हा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. पण श्रीराम मंदिर उभारणीच्या दिशेने केलेल्या या सुरुवातीच्या प्रयत्नांत कल्याणसिंह यांचा सिंहाचा वाटा कुणीही विसरू शकत नाही.
श्रीराम मंदिरनिर्माणाबरोबरच उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पार्टीचा पाया भरभक्कम करण्यातही कल्याणसिंह यांचे योगदान महत्त्वाचे आहे. मंडल आणि कमंडल अशी सांगड घालत केलेल्या सोशल इंजीनियरिंगने भाजपाचा चेहरामोहरा बदलला. ९०च्या दशकात जेव्हा मंडलच्या राजकारणाचा प्रयोग सुरू झाल्यावर आरएसएसला उत्तर प्रदेशात एका अशा व्यक्तीची गरज होती, जी हिंदुत्वाबरोबरच मागासवर्गीयांनाही सोबत घेऊन भाजपाचा रथ वेगाने पुढे नेऊ शकेल.
कल्याणसिंह यांच्या रूपात भाजपाला तसा चेहरा लाभला. कल्याण सिंह हे लोधी समुदायाचे नेते होते आणि त्यांचे प्राबल्य मध्य उत्तर प्रदेश ते पश्चिम उत्तर प्रदेशपर्यंत पसरलेले होते. यादव आणि कुर्मी यांच्यानंतर या समुदायाचा लोकसंख्येनुसार तिसरा क्रमांक होता. कल्याणसिंह यांनी विविध समाजघटकांना भाजपाशी जोडण्याचा कायम प्रयत्न केला. कल्याणसिंह यांच्या या मंडल-कमंडल प्रयोगाला अनेक स्तरातून विरोधही झाला पण त्यांनी समाजात समानता, समरसतेशिवाय हिंदू धर्माची कल्पनाही करू शकत नाही अशी रोखठोक भूमिका मांडली. हिंदुत्वाची व्यापक भूमिका मांडून त्यांनी भाजपाचा पाया अधिक विस्तारला.
१९९१मध्ये जेव्हा ते प्रथम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले, तेव्हा त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्षांची यादी पाहून संताप व्यक्त करत ती यादीच फाडून टाकली होती. केवळ सवर्ण नको तर इतर समाजघटकांनाही एकत्र आणा, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामागील भूमिका ही भाजपाने कक्षा रुंदावण्याच्या गरजेपोटीच होती.
१९९२मध्ये हजारो कारसेवक बाबरी मशिद ध्वस्त करण्यासाठी अयोध्येत गोळा झाले तेव्हा त्यांच्यावर गोळीबार न करण्याचे आदेश कल्याणसिंह यांनी दिले होते. ती एखादी राजकीय भूमिका नव्हती तर राष्ट्र आणि हिंदुत्व याला सुसंगत असेच ते पाऊल होते. कारसेवकांनी जे केले ते देशासाठी अभिमानास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती ती त्या भावनेतूनच. कल्याणसिंहांच्या या भूमिकेमुळे ते हिंदुंच्या गळ्यातील ताईत बनले.
हरिश्चंद्र श्रीवास्तव यांनी सर्वप्रथम कल्याणसिंह यांच्यातील खुबी ओळखली आणि त्यांना पुढे आणले. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनाही कल्याणसिंह यांची योग्यता त्यांनी पटवून दिली. १९६२मध्ये जनसंघाला उत्तर प्रदेशात एक सक्षम असे नेतृत्व हवे होते. कल्याणसिंह यांना त्यावेळी अतरोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले. पण कल्याणसिंह पहिल्या निवडणुकीत पराभूत झाले. पण हार मानतील ते कल्याणसिंह कसले? १९६७च्या निवडणुकीत त्यांनी तेवढाच मोठा विजयही मिळविला. त्यानंतर १९८०पर्यंत ते कायम त्या विभागातून निवडून येत राहिले.
१९९१मध्ये तर त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने उत्तर प्रदेशात ४२५पैकी २२१ जागा जिंकत भाजपाचे स्थान भक्कम केले. पहिल्या भाजपाशासित राज्याचे ते पहिले मुख्यमंत्री ठरले. दोनवेळा मुख्यमंत्री, भाजपा सचिव, भाजपा अध्यक्ष, उत्तर प्रदेशमधील भाजपाचे नेते आणि नंतरच्या काळात राज्यपाल अशा विविधांगी भूमिकाही त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. उत्तर प्रदेशच्या प्रगतीमध्ये कल्याणसिंह यांचे योगदान विसरून चालणार नाही.
हे ही वाचा:
‘खत्री’लायक कामगिरी; जागतिक अॅथलेटिक्समध्ये रौप्यपदक
मध्य रेल्वे बांधणार १३ पादचारी पूल नव्याने
‘मोदी एक्सप्रेस’ ने जाऊया, गणरायाला वंदुया
अफगाणिस्तानातून जवळपास ४०० जणांना आणले भारतात
आज उत्तर प्रदेशमध्ये असलेला भाजपाचा बोलबाला कल्याणसिंह यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला घेतलेल्या अफाट मेहनतीचा परिपाक आहे. म्हणूनच त्यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली की, ‘भारतीय समाज नेहमीच कल्याणसिंह यांचा ऋणी राहील. भारतीय विचारमूल्यांशी कल्याणसिंह यांचे अतूट नाते होते आणि आपल्या प्राचीन संस्कृतीवर त्यांचे प्रेम होते, श्रद्धा होती.’