तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुराची पाहणी करण्यासाठी गेलेले असताना चंद्रशेखर राव म्हणाले की, भारतातील अनेक भागात जी ढगफुटी झाली आहे, त्यासाठी परकीय शक्ती जबाबदार आहे. राव यांच्या या विधानाची सध्या खूप चर्चा आहे.
पुराचा फटका बसलेल्या भद्रचलम शहराला त्यांनी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त शंका व्यक्त केली. पूरग्रस्तांसाठी त्यांनी १००० कोटींची मदतही जाहीर केली.
त्यावेळी ते म्हणाले की, ढगफुटी ही एक नवी पद्धत समोर येते आहे. यामागे कटकारस्थान असल्याची शंका व्यक्त होत आहे. ती कितपत खरी आहे माहीत नाही पण काही देशांकडून भारतात जाणीवपूर्वक ढगफुटी केली जात आहे. अशाप्रकारे याआधी लेह (लडाख) मध्ये ढगफुटी झाली होती. तशी ती उत्तराखंडमध्ये करण्यात आली. मला अशी उडत आलेली बातमीही कळली आहे की, गोदावरीच्या खोऱ्यातही असेच काहीसे घडले आहे. काहीही कारण असेल तरी वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे ते झालेले आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या लोकांची काळजी घेतली पाहिजे.
सध्या तेलंगणात जोरदार वृष्टी होत असून येत्या २९ जुलैपर्यंत अशीच स्थिती राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राव यांनी म्हटले आहे की, पुनर्वसन केंद्रातील लोकांना पुन्हा घरी पाठविण्याची घाई नको. कारण अशी पूरस्थिती पुन्हा उद्भवू शकते.
हे ही वाचा:
शिवसेना नेते रामदास कदम यांचा राजीनामा
राज्य शासनाकडून अपघातग्रस्तांना १० लाखाची मदत जाहीर
“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”
अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू
राव यांनी ढगफुटीबाबत केलेल्या दाव्यावर बोलताना भाजपाचे तेलंगणा अध्यक्ष बंदी संजय कुमार म्हणाले की, हा या शतकातील मोठा विनोद आहे. आपली हतबलता लपविण्यासाठी केसीआर यांनी ही क्लृप्ती लढविली आहे. लोकांचे लक्ष मुख्य प्रश्नांपासून दूर करण्यासाठी हे दावे केले जात आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांनी राज्यातील ढगफुटी मागे विदेशी शक्तींचा हात असल्याचा आरोप केला आहे.
त्यांच्या राज्यातील ढगफुटी मागे भाजप किंवा मोदी सरकारचा हात असल्याचा संशय व्यक्त न केल्याबद्दल के सी आर यांना धन्यवादच द्यायला हवेत.
🙏🙏🌷🌷 pic.twitter.com/H11AH5ZXTe— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 18, 2022
तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांनी राज्यातील ढगफुटी मागे विदेशी शक्तींचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या राज्यातील ढगफुटी मागे भाजप किंवा मोदी सरकारचा हात असल्याचा संशय व्यक्त न केल्याबद्दल के सी आर यांना धन्यवादच द्यायला हवेत, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राव यांच्यावर टीका केली आहे.
तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांनीही राव यांच्या या वक्तव्यावर टीका करताना जर परकीय शक्तींचा ढगफुटीत हात आहे, अशी शंका राव यांना येत असेल तर त्यांनी याची माहिती गुप्तचर यंत्रणांना द्यावी असे म्हटले आहे.