देशाची माफी मागा! विरोधकांवर ज्योतिरादित्यांचा घणाघात

ज्योतिरादित्य शिंदेंनी केला विरोधकांवर जोरदार प्रहार

देशाची माफी मागा! विरोधकांवर ज्योतिरादित्यांचा घणाघात

भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकसभेतील आपल्या भाषणात विरोधी पक्षांवर कठोर प्रहार केले. ते म्हणाले की, ज्यांनी अविश्वास ठराव आणला त्यांचाच त्यावर विश्वास नाही. शिंदे म्हणाले की, मी २० वर्षे संसदेत आहे. पण यापूर्वी मी असे काही पाहिले नाही. जी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर आहे, जी व्यक्ती देशाच्या १४० कोटी जनतेच्या हृदयात आहे, अशा व्यक्तीबद्दल विरोधकांनी जे शब्द वापरले ते निंदनीय आहेत. या शब्दांबद्दल विरोधकांनी देशाची माफी मागितली पाहिजे.

 

विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या भाषणा पंतप्रधानांवर वाईट शब्दांत टीका केली होती. कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या निरव मोदीशी पंतप्रधानांची तुलना अधीर रंजन यांनी केल्यानंतर सभागृहात खळबळ उडाली होती. भाजपाच्या खासदारांनी निषेध करत यासंदर्भात अधीर रंजन यांनी माफी मागितली पाहिजे असे म्हटले. त्याची दखल ज्योतिरादित्य यांनी घेतली.

 

 

ते म्हणाले की, हा अविश्वास ठराव आहे त्याचा मणिपूरशी काहीही संबंध नाही. केवळ आपल्या पोळ्या शेकविण्यासाठी त्यांनी या ठरावाचा उपयोग केला आहे. पंतप्रधानांनी मणिपूरसंदर्भात आपले मत व्यक्त केले होते. पण आपले मत त्यांनी संसदेतही व्यक्त केले पाहिजे असे म्हणत विरोधकांनी दबाव आणला. स्वतः अमित शहा यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तयार होते पण त्याचीही तयारी विरोधकांनी दाखविली नाही.

हे ही वाचा:

भारतातील किशोरवयीन मुलांना शोषणास प्रवृत्त करणाऱ्याला १२ वर्षे तुरुंगवास

विषारी मशरूममुळे सासू-सासरे बळी; पण जेवण बनवणारी सून जिवंत

सर्वसामान्यांना दिलासा; रेपो रेट जैसे थे स्थितीत

आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलासह १५जणांविरुद्ध अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल

 

शिंदे म्हणाले की, मणिपूरमध्ये १९९३, २०११मध्ये जो हिंसाचार झाला त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान नरसिंहाराव आणि मनमोहन सिंग यांनी का मौन धारण केले होते. मग हे दुटप्पी राजकारण नाही का? इंडिया या त्यांच्या गटात राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोजकुमार झा यांनी नैतिकतेची भाषा केली. पण त्यांच्या पक्षाने भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली त्यांना हे विचारण्याचा अधिकार तरी आहे का?

 

 

त्याचवेळी विरोधक सभागृह सोडताना दिसल्यावर ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, लोकांनी यांना बाहेर घालविले आहे आणि आता ते संसदेतूनही बाहेर जात आहेत.

 

राहुल गांधी यांच्यावरही ते बरसले. प्रथमच त्यांनी संसदेत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की, मणिपूर हा भारताचा भाग नाही असे पंतप्रधानांना वाटते. पण याच पंतप्रधानांनी इशान्य भारत जगाशी जोडला आहे. इशान्य भारताशी त्यांचे अत्यंत जवळचे नाते आहे. भारतात फूट पडावी ही तुमची विचारसरणी असेल आमची नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.

 

होय, तुमच्यामुळेच मी बदललो

ज्योतिरादित्य शिंदे नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांविषयी बोलत असताना विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. तुम्ही आता बदलला आहात असे ते म्हणाले. तेव्हा ज्योतिरादित्य संतापून म्हणाले की, होय, तुमच्यामुळेच बदललो आहे मी. पण आता मला तोंड उघडायला लावू नका.

Exit mobile version