“शरद पवारांनी स्वतःच या प्रकरणाची चौकशी करावी.” असे विधान, माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपांवर ज्युलिओ रिबिरो यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यावर आता ज्युलिओ रिबेरो यांनी शरद पवारांच्या या मागणीला केराची टोपली दाखवल्याचे चित्र दिसत आहे.
“गृहमंत्री अनिल देशमुखांवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याद्वारे लगावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याची माझी इच्छा नाही. माझं वय ९२ वर्षांचं आहे, आणि अशा पद्धतीच्या चौकशा करण्यासाठी मी आता सक्षम राहिलेलो नाही आणि जरी माझी क्षमता असती तरीही मी या चौकशीत पडलो नसतो. कारण हे प्रकरण माझ्यासारख्या व्यक्तीसाठीचं नाहीच आहे. (राष्ट्रवादी काँग्रेस) पार्टीचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार यांनीच या प्रकरणाची चौकशी करावी. त्यांना हा सर्व प्रकार माहित आहे, त्यामुळे त्यांनी या सर्व प्रकरणावर कारवाई केली पाहिजे. त्यांना कारवाई करावीही लागेल कारण जनतेला आता या सर्व प्रकारचा तिटकारा आला आहे.”
हे ही वाचा:
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडीत मतभेद?
राज्यपालांनी सत्यकथन करणारा अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवावा
पवारांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलेल्या आरोपामुळे महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. आघाडी सरकारच्या विविध पक्षांमधून या प्रकरणावर वेगवेगळे सूर प्रकट केले जात आहेत. अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझेंना १०० कोटी रुपयांची वसूली दरमहा करायला सांगितली असा आरोप परमबीर सिंग यांनी केल्यामुळे, आता शरद पवारांनाही सचिन वाझे प्रकरणाचाच भाग असलेल्या या ‘स्थानिक’ विषयावर बोलायला भाग पाडले आहे.