अमेरिकेत ट्रम्प धोरणांच्या विसर्जनाला प्रारंभ

अमेरिकेत ट्रम्प धोरणांच्या विसर्जनाला प्रारंभ

अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर जो बायडन यांनी पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक निर्णय फिरवायला सुरूवात केली आहे. बायडन यांनी देशापुढील चार महत्त्वाच्या प्रश्नांवर एकदमच काम सुरू केलं आहे. बायडन यांना महामारी, वर्णद्वेष, वातावरण बदल आणि मंदी या संकटांचा एकत्रित सामना करावा लागणार आहे. यापैकी अनेक निर्णय बायडेन यांच्या पहिल्याच दिवशी घेतले जाण्याची शक्यता आहे.

बायडेन भलेही विविध निर्णय परत फिरवणार असले, तरीही समस्त भारतीयांना अमेरिकेच्या नागरिकत्वाच्या २०२१ च्या कायद्याकडे लक्ष लागले आहे. 

भारतातले उच्चविद्याविभूषित, आय टी क्षेत्रातले अनेक तरूण अमेरिकेत एच-१बी व्हिसा घेऊन स्थिरावतात. मात्र मागील ट्रम्प प्रशासनाने केलेल्या मोठ्या बदलांमुळे भारतीयांना अमेरिकेत नोकरीनिमित्त येणे अवघड झाले होते. हरित कार्ड मिळवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने, प्रत्येक देशाना सात टक्क्यांचा कोटा निश्चित केला होता. याशिवाय मिळकतीवर आधारित इमिग्रेशनचे नियम देखील कडक केले होते. ट्रम्प प्रशासनाने जाता जाता देखील हे नियम अधिकच कडक केले होते.

नव्यानेच निवडून आलेल्या बायडेन प्रशासनाचा स्थलांतराचे नियम शिथिल करण्याचा विचार आहे. त्यानुसार विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग आणि गणित या विषयातली उच्चविद्याविभूषीत अमेरिकेत राहू शकतील. शिवाय हरित कार्ड मिळवणे देखील सोपे होऊ शकेल. बायडेन प्रशासन हरित कार्डाचा प्रत्येक देशानुसार दिला जाणारा कोटा रद्द करण्यात येणार आहे. 

यातील बरेच निर्णय पहिल्या १० दिवसात घेतले जाण्याची शक्यता आहे. या शिवाय पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेत सामील होणे, पॅरिस करारात समाविष्ट होणे अशा सारखे निर्णय घेऊन बायडेन जुने निर्णय उलट फिरवत आहेत.

Exit mobile version